पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

0

राजेंद्र पंढरपुरे: यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाचे गणपती आणि प्रमुख मंडळांनी घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग शहरात वाढला आहे आणि पावसाळ्यामुळे ऑगस्ट महिन्यात संसर्गाचा धोका आणखी वाढेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे शहरातील सर्वच सण, उत्सवावर परिणाम झाले असून गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उत्सव साधेपणाने साजरा करायचा असा निर्णय प्रमुख गणेश मंडळांनी मे महिन्याच्या शेवटी घेतला. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढलाच आहे. गेल्या चार महिन्यातील मृत्यूचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. शहरातील श्रीमंत-गरीब, झोपडपट्टी -सोसायट्या आशा सर्वच स्तरात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. साथीची आकडेवारी पाहाता तिचे गांभीर्य लक्षात येते आणि त्यामुळे प्रत्येक पुणेकर काळजीग्रस्त आहे.

१३ मार्च रोजी पुण्यात पहिला रुग्ण आढळला. त्या दिवसापासून जनजीवन विस्कळीत झाले. १८ मार्च रोजी राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केली. दि.२३ मार्च रोजी केंद्र सरकारने संपूर्ण देशभर टाळेबंदी जाहीर केली. आजपर्यंतच्या सव्वाशे दिवसांच्या टाळेबंदीमुळे शहरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. एकीकडे साथीचा वाढता प्रसार आणि दुसरीकडे आर्थिक संकट अशा पेचात देशातील अन्य भागांप्रमाणेच पुणे, पुणेकरही सापडले आहेत. त्याचा परिणाम गणेशोत्सवाच्या उत्साहावर झालेला आहे.

यंदा शासकीय निर्बंधानुसार गणेशाचे आगमन आणि विसर्जन याप्रसंगी मिरवणुका काढता येणार नाहीत. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचे प्रचंड आकर्षण सर्वदूर असते. शहरातील वेगवेगळ्या मार्गांवरुन जाणाऱ्या मिरवणुकांमध्ये सुमारे चारशे मंडळे सहभागी होतात. ही मिरवणूक किमान सव्हीस तास चालते. त्यात सहभागी होणाऱ्या ढोल, लेझीम पथकांचा सराव उत्सवाच्या दोन ते अडीच महिने आधीपासून चालू असतो. यावर्षी मिरवणुकीवरच बंदी असल्याने उत्सवातील निम्मा उत्साह संपलेला आहे. साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गर्दी करण्यावर निर्बंध आणण्यात आलेले आहेत. उत्सवकाळात गणपतीपुढे आरास करता येणार नाही आणि दहा दिवस कार्यक्रमही करता येणार नाहीत. त्यामुळे उत्सव काळात मांडव न घालता उत्सवमूर्तीची आहे त्या जागेवरच दहा दिवस पूजा-अर्चा, आरती करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. उत्सवासाठी बाहेरगावाहून येणारे भाविक यंदा अजिबातच येऊ शकणार नाहीत. पुण्यातील लोकांचा सहभागही अत्यंत मर्यादित राहिल. श्रद्धेपोटी भाविक दर्शनाला येतील तेवढ्याच मर्यादेत उत्सव होईल.

गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यातील गणपतीची आगमन मिरवणूक पालखीतून काढण्यात येते. मानाच्या कसबा, जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुका पालखीतून निघतात. मिरवणुकीतील छत्र, चामरं, अब्दागिरी असा सगळा थाट यावेळी मिरवणुकांमध्ये असतो. अखिल मंडई मंडळ, दगडूशेठ गणपतीची सजावट, मार्केटयार्ड मंडळाच्या गणपतीच्या मिरवणुकीतील भव्यता याविषयीचे कुतूहल सर्वत्र असते. याखेरीज भाऊ रंगारी गणपती, राजाराम मंडळ, हत्ती गणपती, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, जगोबादादा तालीम मंडळ, गरुड गणपती, खडकमाळ आळी गणपती या मंडळांची मिरवणुकीतील सजावट आणि रोषणाई लक्षवेधी असते. ती पहाण्यासाठी लाखो लोकं रस्त्यावर थांबलेले असतात. उत्सव काळात दहा दिवस शहरं आणि उपनगरं संध्याकाळच्या वेळेस गजबजून गेलेली असतात. व्यापारी वर्गातून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे शंभर कोटींची उलाढाल या दहा दिवसांच्या उत्सव काळात होते. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांमध्ये पैसा खेळता रहातो. अनेकांच्या व्यवसायाला बरकत येते. यावर्षी मात्र ही सगळी उलाढाल, उत्सवातील आनंद या सगळ्याला मुकावे लागणार आहे.

मार्च महिन्यापासून पुण्यातील जीवन अतिशय नीरस झालेले आहे. अशा वातावरणात गणपतीचा उत्सव मनाला उभारी देईल अशा अपेक्षेने पुण्यातील कार्यकर्ते वाट बघत आहेत. सोशल मिडीयावर असे आशादायी संदेशही व्हायरल होत आहेत. बाप्पाच्या आगमनापूर्वी कोरोनावर प्रभावी लस किंवा प्रभावी औषध सापडू दे अशी मनोमन प्रार्थना या उत्सवाशी बांधलेला प्रत्येकजण करत आहे. या आशेच्या आणि श्रद्धेच्या धाग्यावर पुणेकर साथीचा सामना करत आहेत.

सन १८९७ साली पुण्या-मुंबईत प्लेग ची साथ आली होती. या रोगात रुग्णाच्या काखेत गाठ यायची, ताप यायचा आणि तीन ते चार तासात रुग्ण दगावायचा. त्यावेळी पुण्याची लोकसंख्या कमी होती त्यातही रोज शंभर, सव्वाशे रुग्णांचा मृत्यू होत होता. निम्म्या पुणेकरांनी शहराबाहेर बाडबिस्तरा नेला होता. त्याहीवेळी पुण्यात दोन, तीन वर्षे उत्सव साधेपणाने झाला होता. यावेळचे कोरोनाचे संकट अधिक गंभीर आणि व्यापक आहे. जगात सर्वत्रच साथ असल्याने लोकांना स्थलांतर शक्य नाही. सध्या आहे त्या जागेवर राहूनच साथीशी मुकाबला करायचा आहे. उत्सवापूर्वीच या संकटाचे निवारण व्हावे अशी विघ्नहर्त्या गजाननाकडे प्रत्येकाची प्रार्थना आहे.