पुणे महापालिकेकडुन अंदाजपत्रकाचा फेरआढावा; विकासकामांना कात्री

0

पुणे : कोरोना संकटामुळे उत्पन्न मिळण्यास येत असलेल्या मर्यादा, राज्य शासनाने ३३ टक्के खर्च करण्यासंदर्भात दिलेले आदेश अशा आर्थिक पेचात अडकलेल्या महापालिके कडून अंदाजपत्रकाचा फेरआढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

येत्या काही दिवसांत महापालिका आयुक्तांकडून पुरवणी अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे. यामुळे शहरातील अनेक विकासकामांना कात्री लागण्याची शक्यता आहे.
पुणे मनपाला उत्पन्न कमी मिळणार असल्यामुळे स्वमालकीच्या मोकळ्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याबरोबरच महापालिके च्या मालकीच्या सदनिकांची विक्री करून उत्पन्न जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर अंदाजपत्रकाचा प्रशासकीय आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे.

उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होणार असल्यामुळेच ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उत्पन्नाचा, खर्चाचा, विकास प्रकल्पांचा आढावा घेऊन पुरवणी अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे. तशी हालचाल सुरू झाली आहे. मात्र त्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनात वाद होण्याची शक्यता आहे.

Copy