पुढील सहा महिने खासगी रुग्णालयात लस नाही

 

जळगाव- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लसीकरण सुरू केले खरे परंतु, त्याच्या तिसर्‍या टप्प्याच्या नियोजनात प्रचंड गोंधळ घालून ठेवला. खासगी रुग्णालयात याआधी लस मिळत असताना आता मात्र, त्यांच्याकडील लसींचा पुरवठा थांबवला गेला असून, केवळ मनपा व सरकारी केंद्रातून लस दिली जात आहे. त्यामुळे निवडक केंद्रांवरच लसीकरणासाठी प्रचंड गर्दी होत असून, कोरोना पसरण्याचा धोका वाढला आहे. शिवाय तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अगदी प्रत्येकाची पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत दमछाक होते आहे ती वेगळीच. या गोंधळाची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करायला प्रशासन तयार नाही. यातही धक्कादायक म्हणजे पुढील सहा महिने तरी खासगी दवाखान्यात लस मिळणार नाही, अशी माहिती आहे.
सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे सांगत जिल्ह्यात गाजावाजा करत लसीकरण मोहीम सुरू केली. त्याचे पहिले दोन टप्पे सुरळीत पार पडले पण आता तिसर्‍या टप्प्यात मात्र, प्रचंड गोंधळ उडत आहे. लसींचे डोस कमी आणि लस घेणारे अधिक, लाभार्थींची गर्दी अधिक आणि लसीकरण केंद्रे कमी अशी विचित्र स्थिती शहरात निर्माण झाली आहे. मायादेवीनगरमधील रोटरी हॉल, मनपा रुग्णालय संचालित शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय या ठिकाणी तर पहाटेपासून लसीकरणाठी रांगा लागत आहेत. रेडक्रॉसमधील लसीकरण केंद्राबाहेर गोंधळ होत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. याआधी खासगी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा होती. वय वर्षे 45 व त्यावरील अनेकांनी या ठिकाणी जाऊन पहिला, तर काहींनी दुसराही डोस घेतला. परंतु, सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू करताना खासगी दवाखान्यांसाठीचा लसींचा पुरवठा अचानक थांबवला. हा गोंधळ एवढ्यावर थांबत नाही. मनपाच्या शाहू महाराज रुग्णालयात दुसरा डोस मिळत नाही, त्यासाठी शिवाजीनगरमधील डी. बी. जैन रुग्णालयात जावे लागते. सध्या रेल्वे पुलाचे काम सुरू असल्याने शहराच्या अन्य भागातून शिवाजीनगरला जाणे सोपे नाही. रोटरी भवन व रेडक्रॉसमधील लसीकरण केंद्रात तर अक्षरशः झुंबड उडत आहे. यामध्ये परवड ज्येष्ठांची होत आहे. त्यांना सोयीचे होईल, अशा पद्धतीचे नियोजन का केले जात नाही ? या प्रश्‍नाचे उत्तरही सापडत नाही. खासगी रुग्णालयांत जाऊन लस घेण्याची इच्छा नागरिकांची आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ज्यांनी पहिला डोस घेतला होता, ते आता त्या रुग्णालयांमध्ये दररोज फोन करून लसीसंदर्भात विचारपूस करत आहेत. त्यांना उत्तरे देऊन रुग्णालयाचे कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत. सरकार कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळा, सोशल डिस्टन्स पाळा म्हणून आवाहन करते तर दुसरीकडे लसीकरणात मात्र, त्याचा फज्जा उडत आहे. लसीकरणासाठी लागणार्‍या रांगेतही कोविडबाधित असल्याच्या घटना राज्यात उघड झाल्या आहेत. याची दखल सरकार केव्हा घेणार, गर्दी कमी करण्यासाठी खासगी दखावान्यांमध्ये पूर्वीप्रमाणे लसीकरण केव्हापासून सुरू करणार ? आदी प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

सरकारचे नियोजन चुकले
देशात एक मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण घेण्यासाठी परवानगी देण्यात आली. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले, मात्र सद्यस्थितीत लसीच्या उत्पादनापेक्षा लसींची मागणीही जास्त आहे. त्याचा विचार न करता सरकारने लसीकरण सुरू करण्याची घाई केली का ? असा प्रश्‍न विचारला जात आहे. 45 वर्षे सर्व नागरिकांच्या दोन्ही लस घेऊन झाल्यावरच तिसरा टप्पा सुरू व्हायला हवा होता, असाही सूर आहo

पहिल्या टप्प्यात उत्तम लसीकरण
45 वयाच्या पुढील सर्व नागरिकांचे लसीकरण पहिल्या टप्प्यात झाले. यावेळी खासगी रुग्णालयांमध्ये अतिशय सुरळीतपणे हे लसीकरण पार पडले. शहरातील प्रत्येक खासगी रुग्णालयात जवळजवळ 5 हजार नागरिकांचे लसीकरण करून घेतले. मात्र, दुसरे लसीकरण हे अजूनही शिल्लक आहे. सरकारी लसीकरण केंद्रांवर होत असलेल्या गर्दीच्या भीतीने वयोवृद्ध नागरिक गर्दीत जाणे टाळत आहेत. यामुळे खासगी रुग्णालयांना लवकरच लसीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी नागरिकांची
मागणी आहे.

’जनशक्ती’शी बोलतांना नाव न घेण्याच्या अटीवर एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली की, आम्ही सरकारच्या आदेशानुसार सिरम इन्स्टिट्यूट इतर उत्पादकांशी लसींसाठी चर्चा केली. यातील एका कंपनीने आमच्याकडे लसींचा तुटवडा असल्यामुळे पुढील सहा महिने आम्ही कोरोना प्रतिबंधक लस देऊ शकत नसल्याचा संदेश ई-मेल द्वारे पाठविला आहे.

जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर
जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लसीकरण पोहोचवायचा असेल तर खासगी दवाखान्यांनासुद्धा लसीकरण करण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे. तसेच ती लस देखील त्या दवाखान्यांना उपलब्ध करुन दिली पाहिजे.
– डॉ. राधेश्याम चौधर