पुढील पन्नास वर्षांचे नियोजन सुरू – आयुक्त किरण गित्ते

0

पिंपरी-चिंचवड : पीएमआरडीएच्या अंतर्गत असलेल्या सुमारे सात हजार 257 चौरस किलोमीटरच्या परिसरातील भविष्यातील पन्नास वर्षांचे रस्ते पाणी वाहतूक तसेच उभारण्यात येणारे विविध प्रकल्प यासंदर्भात नियोजन पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी आज येथे दिली. पिंपरी-चिंचवड प्रेस क्लबच्यावतीने नारायण मेघाजी लोखंडे भवन येथे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासावर होणारे परिणाम या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवारी वाहतूक आराखडा

गिते म्हणाले, भविष्यात या परिसरात कोण कोणते प्रकल्प राबविले जावेत कोण कोणते प्रकल्प उभे राहिल्याने त्यामुळे वाढणारे प्रश्‍न हे शहर सोसू शकेल याबाबत विकास आराखडा करण्याचे काम पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या वतीने चालू आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यासंदर्भात एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून एक आराखडा तयार करण्यात आला आहे येथे 27 नोव्हेंबर रोजी हा आराखडा माहितीसाठी सादर केला जाणार आहे. पीएमआरडीए फक्त महानगरांचे दीर्घकालीन योजनांचे विकास आराखडे तयार करण्याचे काम करणार आहे त्याचबरोबर काही पायाभूत सुविधा उभे करण्याचे कामही करणार आहे ही संस्था नियोजन व विकास या दोन तत्त्वांवर उभारण्यात आली आहे.

सात हजार चौ.कि.मी परिसर

जवळपास सात हजार 257 चौरस किलोमीटर परिसरात पीएमआरडीए विकासाचे नियोजन करणार आहे भारतात सर्वात मोठे क्षेत्र असलेले हे प्राधिकरण आहे जवळपास चाळीस ते पन्नास वर्षाचा मास्टर प्लॅन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत असून यासाठी सिंगापूर सरकारची कंपनी सर्बना जुरोंगया कंपनीची मदत घेतली जात आहे या कंपनीला जगभरातील 140 महानगरांचा अनुभव असून त्यांच्या माध्यमातून हा मास्टर प्लॅन तयार केला जात आहे तदनंतर या मास्टर प्लान चे विकास आराखड्यात रूपांतर करण्यात येईल. पीएमआरडीए ला देण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये आज सुमारे 85 लाख इतकी वस्ती असून भविष्यातील दोन कोटी लोकसंख्या अपेक्षित ठेवून हा विकास आराखडा केला जात आहे. यात येथे येणार्‍या लोकांना रोजगार त्यांना राहण्यासाठी जागा शिक्षण आरोग्य पाणी यासारख्या सुविधा याचा विचार केला जाणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांनी स्वागत केले. अरुण कांबळे यांनी प्रास्ताविक केले. विश्‍वास मोरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पीतांबर लोहार यांनी केले.

Copy