पीपल्स रिपब्लिकन, दलित मुक्तीसेनेतर्फे एकदिवसीय चेतावणी उपोषण

0

जळगाव । पिपल्स रिपब्लिकन पार्टी, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राजु मोरे यांच्या नेतृत्वात चेतावणी उपोषण बुधवार 5 एप्रिल रोजी करण्यात आले. मागण्या 10 एप्रिलपर्यंत मंजूर न केल्यास 11 एप्रिलपासून महानगर पालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशार देण्यात आला आहे.

याप्रसंगी महानगराध्यक्ष नारायण सपकाळे, महानगर जिल्हा अध्यक्ष कल्पेश मोरे, जेष्ठ नेते बी.के. बनसोडे, अशफाक बागवान, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, कॉग्रसचे निमजी गायकवाड, राजेंद्र सोनवणे, किरण पवार, सुनिल देहडे, दिपक सुरडकर, शांताराम अहिरे, संगीता सामुद्रे, सहदेव पाटील, रिपईचे दिपक सपकाळे, भिमराव सपकाळे यांनी भेट देवून जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.

दिक्षाभूमी समिती बरखास्त करण्याची मागणी
निवेदनात महानगर पालिकेतर्फे शहरात दिक्षाभूमी निर्माण करण्याची घोषणा 2006 साली तात्कालीन महापौर प्रदिप रायसोनी यांनी केली होती. तसेच दिक्षाभूमीचे निर्माण करण्यासाठी शिवचरण ढंढोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. सध्या ही समिती अस्तित्वात आहे किंवा नाही याचा खुलासा मोरे यांनी मागितला आहे. तसेच ही समिती अस्तित्वात असेल तर अशी निष्क्रीय समिती बरखास्त करून शहरातील सामाजिक कार्यर्त्यांचा सहभाग असणारी नवीन समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तसेच 10 एप्रिलपर्यंत दिक्षाभूमीच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

523 सफाई कामगारांच्या जागा भरा….
गेल्या 10 वर्षांपासून महानगर पालिकेत सफाई कामगारांच्या रिक्त 585 पैकी 523 रिक्त जागा पुर्नजिवीत करून महापालिकेने नव्याने ठराव करून रिक्त 523 सफाई कामगारांच्या जागा भरण्याची मागणी केलेली आहे. रेल्वे स्टेशन जवळील शहर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेली, अतिक्रमीत रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पोलीस चौकीचे अतिक्रमण त्वरीत काढावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.