‘पीएमपी’च्या थेट वाहतूक सेवा आता बंद

0

नगर रस्त्यावरील लांब पल्ल्याची सेवा आता दोन टप्पात

पुणे : सातत्याने जाम होणारा रस्ता, कोंडी यामुळे अनेकदा पीएमपीच्या लांब पल्ल्यांच्या मार्गावरील फेर्‍यांना उशीर होतो, तर काही वेळा नाइलाजास्तव फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की ओढवते. यामुळे पीएमपीने नगर रस्त्यावरील लांब पल्ल्याची थेट वाहतूक बंद केली आहे. जादा बसेस उपलब्ध व्हाव्या आणि फेर्‍यांची संख्या वाढून प्रवाशांना सुरळीत सेवेसाठी या मार्गावर दोन टप्प्यांत वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

याची अंमलबजावणी सुरू

पीएमपीतर्फे शहरासह उपनगरांतही सेवा पुरवली जाते. यानुसार नगर रस्त्यावरून वाघोली, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, पाबळ या लांब पल्ल्यांच्या मार्गावर सेवा दिली जाते. महापालिका ते पाबळ अंतर सुमारे 41 किलोमीटर इतके मोठे आहे. यातच नगर रस्ता सातत्याने वाहतूककोंडीत अडकत असल्याने ये-जा करणार्‍या पीएमपी बसेसला उशीर होत असे, तर अनेकदा तासन्तास बस कोंडीत अडकून पडल्याने फेर्‍याही रद्द करण्याची नामुष्की येते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक दोन टप्प्यात सुरू करण्यात आली असून मंगळवारपासून (दि.20) त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

पालिका ते वाघोलीपर्यंतच बस

सध्या नगर रस्त्यावरील पाबळ, शिक्रापूर आणि तळेगाव या भागात जाणार्‍या प्रवाशांना महापालिका येथील पीएमपी स्थानकावरून थेट सेवा दिली जात होती. मात्र, आता महापालिका ते वाघोलीपर्यंत सेवा दिली जाणार आहे. तर, वाघोली येथून दुसर्‍या बसने पुढील प्रवास करावा लागणार आहे. यासाठी बसेसची संख्या वाढवण्यात आली असून फेर्‍यांमध्ये वाढ होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना दर दहा मिनिटांच्या वारंवारितेने बस उपलब्ध करून दिल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

दर दहा मिनिटांनी प्रवाशांसाठी बस

नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी, लांब पल्ल्याच्या मार्गामुळे अनेकदा बसेसला उशीर होत असे. यामुळे दोन टप्प्यात वाहतूक सुरू करण्यात आली असून फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. नव्या वेळापत्रकानुसार दर दहा मिनिटांच्या वारंवारितने प्रवाशांना बसेस उपलब्ध होणार असल्याने गैरसोय टळणार असल्याचे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने यांनी सांगितले.

यामुळेच थेट बससेवा बंद…

नगर रस्त्यावरील वाहतूककोंडीमुळे फेर्‍यांची संख्या कमी
लांब पल्ल्यांचा मार्ग असल्याने बसेसला उशीर
महापालिका ते वाघोली आणि वाघोली ते पाबळ, तळेगाव या दोन टप्प्यात फेर्‍या वाढण्याची शक्यता
प्रवाशांना जादा बसेस उपलब्ध होऊन प्रवास सुखकर

तीन महिन्यांपूर्वीच स्टेशनची सेवा बंद

लांब पल्ल्यांच्या सुरळीत वाहतुकीसाठी साधारण तीन महिन्यांपूर्वी पुणे स्टेशन ते राजगुरूनगर थेट सेवा बंद करण्यात आली. तेव्हापासून पुणे स्टेशनवरून भोसरीपर्यंत सेवा पुरवली जाते. तसेच भोसरीवरून राजगुरूनगरसाठी बसेस उपलब्ध केल्या आहेत. यातच नगर रस्ता वाहतूककोंडीत अडकत असल्याने बसेसला उशीर होत असल्यामुळे ती सेवाही खंडीत केली आहे.

Copy