पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षकांना तीन दिवसातच साईड पोस्टींग ?

0

अपर पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात वर्णी : पोलिस दलात खळबळ

भुसावळ (गणेश वाघ)- पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांच्याविरुद्ध असलेल्या वाढत्या तक्रारी व आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या आंंदोलनानंतर तीन दिवसांपूर्वीच पाटील यांची जळगाव वेलफेअर विभागात बदली करण्यात आली होती तर त्यांच्या जागी वरणगावचे सहाय्यक निरीक्षक सचिन सानप यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेवून तीन दिवस होत नाही तोच त्यांना चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या कार्यालयात रीडर म्हणून नियुक्ती देण्यात आल्याचे समजते. सानप यांनी वरणगावचा पदभार घेतल्यानंतर अवैध धंदे चालकांवर कारवाईअस्र उगारल्यानंतर सर्वसामान्य जनतेने त्यांच्या कामाचे स्वागत केले होते शिवाय सानप यांची बदली राजकीय दबावातून केल्याचा आरोप नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला होता. सानप यांना पुन्हा वरणगावात नियुक्ती द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे शिवाय त्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. वरणगावात आता सारीका कोडापे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता आगामी काळात जिल्हा पोलिस अधीक्षकांची भूमिका काय असेल? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

राजकीय दवाबाने अधिकारीही अस्वस्थ
पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये राजकीय दबाव हा काही नवीन भाग नाही मात्र नियुक्तीच्या अवघ्या 20 दिवसानंतर वरणगावातील सानप यांची पिंपळगावात नियुक्ती तर तेथेही पदभार घेतल्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी मिळालेली साईड पोस्टींग यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अवघ्या काही दिवसात केलेल्या कारवायांमुळे गुन्हेगारांवर जरब बसली आहे शिवाय जिल्हावासीयांनाही त्यांनी आपलेसे केले आहे. पोलिस दलाने राजकीय दबाव झुगारून काम केल्यास निश्‍चितच पोलिस अधिकार्‍यांच्या कामकाजात सुसूत्रता येणार आहे. सातत्याने होणार्‍या बदल्यांमुळे पोलित दलातील अधिकारी अवस्थ झाले आहे. अशा प्रकारे होत असलेल्या बदल्यांमुळे अधिकारी काम कसे करणार? असा प्रश्‍नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

बदली नाही, कामाांसाठी बोलावले -प्रशांत बच्छाव
सचिन सानप यांची बदली करण्यात आलेली नाही, चाळीसगाव विभागातील प्रलंबित कामांचा निपटारा करावयाचा असून अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष टीम बनवण्यासाठी त्यांना काही दिवसांसाठी बोलावण्यात आल्याचे चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

Copy