पिंपरूड अपघात ; रावेरच्या जखमी महिलेचा मृत्यू

अपघातातील मृतांची संख्या झाली दोन इंडिका व फॉर्च्युनरमध्ये झाला होता अपघात

सावदा  : भरधाव फॉर्च्युनर व इंडिका वाहनात धडक होवून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घअना सावदा-पिंपरुड रस्त्यावर गुरुवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात जखमी झालेल्या व व्ही.एस.नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परीवारातील महिलेचाही उपचारादरम्यान शनिवारी निधन झाल्याने शोककळा पसरली आहे. रेखा हेमंत नाईक (40, रावेर) असे मयत महिलेचे नाव आहे.

भीषण अपघातात फॉर्च्युनरचा चक्काचूर
सावदा येथून जवळ असलेल्या मोठा वाघोदा येथील रहिवासी व माजी उपसभापती भरतशेठ वसंतराव सुपे यांच्या मोठ्या मुलाचे नुकतेच लग्न झाल्यानंतर रविवार, 5 डिसेंबर रोजी सावदा येथे रीसेप्शन असल्याने खरेदीनिमित्त कुटुंबातील सदस्य गुरुवारी सकाळी फॉर्च्युनर (क्रमांक डी.एल.10 ए.6165) ने जळगावी जात असताना सावदा-पिंपरुड (आमोदा-भिकनगाव हायब्रीड रस्त्यावर) दरम्यान भरधाव फॉर्च्युनरची समोरून येणार्‍या इंडिका (क्रमांक एम.एच.19 पी.2612) यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की फॉर्च्युनर गाडी झाडावर आदळल्यानंतर शेतात शिरली. या भीषण अपघातात भावना भरत सुपे (40, रा.वाघोदा) यांचा जागीच मृत्यू झाला तर विद्या काशिनाथ (गोटुशेठ) सुपे व मुलगा कृष्णा भरत सुपे (मोठे वाघोदा) यांच्यासह इंडिका वाहनातील प्रवासी व रावेर येथील व्ही.एस.नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परीवारातील रेखा हेमंत नाईक (40), प्रतीक हेमंत नाईक (20), प्रीती हेमंत नाईक (18, रा.रावेर) असे पाच जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, जखमी असलेल्या रेखा नाईक यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू असताना त्यांची शनिवारी प्राणज्योत मालवली. या घटनेने नाईक परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.