पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नवीन संकल्पना

0
आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये कायम सुसंवाद राहायला हवा. पोलीस यंत्रणा समाजात समाजासाठी काम करत आहे, याचा अनुभव नागरिकांना यायला हवा. ठाण्यात पोलीस नाही, तर समाजात दिसायला हवेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून विविध संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर ‘फोन अ फ्रेंड’ आणि ‘पोलीस आपल्या दारी’ या संकल्पना राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.
ठराविक ठिकाणी तक्रारपेटी
आयुक्त म्हणाले, नागरिकांच्या तक्रारी आणि वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईसाठी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. मोठ्या वसाहती, पोलीस चौकी आणि अन्य ठराविक ठिकाणी तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात टाकाव्यात. त्या तक्रारी ठराविक दिवशी वाचून पोलीस त्याबाबत त्वरित कारवाई करतील. तसेच त्याबाबत आवश्यक ती माहिती तक्रारदाराला देतील. वाहतूक विभागाकडून करण्यात येणा-या कारवाया आणि त्यांचे दंड वसूल करण्यासाठी देखील या संकल्पनेचा उपयोग होणार आहे. एखाद्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याबाबत वाहतूक विभाग पुरावे जमा करून थेट वाहन मालकाच्या घरी जाऊन दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही योजना पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येणार आहे.
पेइंग गेस्ट आणि महिला वसतिगृहांचा आढावा घेणार
आयुक्त म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराला औद्योगिक नगरी म्हटले जाते. तसेच शहरात आयटी इंडस्ट्री देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरात भाड्याने राहणा-या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेइंग गेस्टची संकल्पना देखील शहरात मोठ्या प्रमाणात रूढ होत आहे. नोकरी करणा-या व शिक्षण घेणा-या महिला व मुली महिला वसतिगृहात राहतात. अशा भाडेकरू, पेइंग गेस्ट आणि महिला वसतीगृहाचा पोलिसांकडून आढावा घेतला जाणार आहे. नोकरी करणा-या, शिक्षण घेणा-या मुलींवर अतिप्रसंग किंवा त्यांना येणा-या अडचणी यामुळे पोलिसांना समजतील आणि त्यांना त्यातून सोडविण्यास पोलीस मदत करू शकतील. या संकल्पनेतून हा आढावा घेतला जाणार आहे.
Copy