पिंपरी-चिंचवडमध्ये स्कुलोत्सवाचे आयोजन

0

पिंपरी । पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने महापौर चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2019-20 चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील 23 क्रीडा मैदानांवर होणा-या स्पर्धांमध्ये एकूण 19 हजार 86 विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. विजेत्या स्पर्धकातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकांचीच निवड होणार आहे, अशी माहिती उपमहापौर तथा क्रीडा सभापती तुषार हिंगे यांनी गुरूवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका ही येवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेणारी राज्यातील एकमेव महापालिका आहे. 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये 20 प्रकारच्या खेळांचा समावेश आहे. भोसरीच्या इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज क्रीडा संकुल याठिकाणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. या स्पर्धा शहरातील 23 ठिकाणच्या क्रीडा मैदानांवर होणार आहेत, असेही उपमहापौर हिंगे यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघ आणि खेळाडूंना रोख स्वरुपात बक्षिसांचे वितरण होणार आहे. ट्रॉफी, मेडल्स व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत ज्या शाळा कधी क्रीडा प्रकारात निपूण नव्हत्या, त्या शाळेतील खेळाडूंना देखील सहभागी करून घेतले आहे. अशा 50 ते 60 टक्के शाळा या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती उपमहापौर हिंगे यांनी दिली.

स्पर्धेतील क्रीडा प्रकार
या क्रिडा स्पर्धांमध्ये अ‍ॅथलेटिक्स (मैदानी), फुटबॉल, कबड्डी, बुध्दीबळ, बास्केट बॉल, स्केटींग, कुस्ती, जलतरण, व्हॉली बॉल, हॉकी, योगा, बॅडमींटन, क्रिकेट, थ्रो बॉल, हॅड बॉल, खो खो, कराटे, किक बॉक्सिंग, तायक्वांदो आणि बॉक्सिंग अशा 20 प्रकारच्या क्रिडा प्रकारांचा समावेश आहे.

Copy