पिंपरी-चिंचवडमध्ये रिव्हर सायक्लोथॉन रॅली पार पडली उत्साहात

0

महानगरपालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे व महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्यावतीने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान

राष्ट्रीय खेळाडू अंजली भागवत हिची उपस्थिती

पिंपरी : इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान जनजागृती मोहिमे अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे व महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर सायक्लोथॉन रॅली रविवारी शहरात उत्साहात पार पडली. पहिल्या टप्यातील रिव्हर सायक्लोथॉन रॅलीतील आमदार महेश लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय खेळाडू अंजली भागवत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, प्रभारी क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, क्रीडाअधिकारी रज्जाक पानसरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवी, जयश्री भोज, राजू कोतवाल, विश्‍वास गेंगजे, नंदकुमार फुगे, अविरत श्रमदान संस्थेचे डॉ.निलेश लोंढे, दिगंबर जोशी, सचिन ऊर्फ भय्यासाहेब लांडगे, बार असोसिएशनचे प्रतिनिधी, डॉक्टर असोसिएशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने तसेच खाजगी व मनपाच्या शाळेतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

आमदार, आयुक्त झाले सहभागी

नदी स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी घेण्यात आलेल्या रिव्हर सायक्लोथॉन रॅलीमध्ये चार हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. दुसर्‍या टप्यातील रॅलीमध्ये आमदार महेश लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहभाग घेतला होता. कै.अंकुशराव लांडगे नाटयगृहा समोरील गाव मैदान ते तिर्थक्षेत्र आळंदी व पुन्हा तिर्थक्षेत्र आळंदी ते कै.अंकुशराव लांडगे नाटयगृहासमोरील गाव मैदानापर्यंत 25 किलोमीटरचे अंतर सायकलिंग करुन पार पाडले. तिसर्‍या टप्यातील रिव्हर सायक्लोथॉन रॅलीत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना माहापौर राहुल जाधव यांनी झेंडा दाखवून रॅलीचा प्रारभ केला. पिंपरी-चिंचवड शहरातील खाजगी व मनपा शाळांमध्ये ’मी पाहिलेली नदी’ या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये 64 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विविध शाळांचा सहभाग

रिव्हर सायक्लोथॉन रॅलीमध्ये सिद्धेश्‍वर, प्रियदर्शनी, महात्मा फुले, रामभाऊ मोझे, एसएनबीपी, मंजिरीबाई, समता, मास्टर माईंड, विद्यानिकेतन, गायत्री, श्रीराम, संत ज्ञानेश्‍वर, संतसाई आदी शाळांनी भाग घेतला होता. पहिल्या टप्यातील रिव्हर सायक्लोथॉन रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान, भोसरी आळंदी रोडमार्ग मॅगझीन चौकाकडुन आळंदी देहू फाटा, डुडुळगाव व मोशीवरुन परत भोसरी गावजत्रा मैदान असा असून यामध्ये 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दुसर्‍या टप्यातील रिव्हर सायक्लोथॉन रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान, ते कृषी उत्पन्न बाजार समिती, जाधववाडी, स्पाईनरोड मार्गाने हायवे व परत भोसरी गावजत्रा मैदान असा असून यामध्ये 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तिसर्‍या टप्यातील रिव्हर सायक्लोथॉन रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान, ते गणेश साम्राज्यचौक, स्पाईनरोड सर्कल पासून परत भोसरी गावजत्रा मैदान असा असून यामध्ये 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Copy