पिंपरी-चिंचवडमध्येही प्लास्टिकचा वापर सर्रास!

0

पिंपरी: पर्यावरणाचा र्‍हास टाळण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करुन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होताना दिसून येत आहे. पिंपरी, चिंचवड आणि निगडी परिसरात प्लास्टिकचा अधिक वापर होत असल्याचे पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने प्लास्टिक बंदीवरील कारवाई तीव्र करणे अपेक्षित आहे. पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर बंदी घातली आहे. 23 मार्च रोजी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.

पालिकेकडून जनजागृती
प्लास्टिकच्या वापराबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून तसेच विविधस्तरांतून जनजागृती केली जात आहे. तरी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर अद्याप थांबलेला नाही. बाजारांमध्ये किरकोळ व्यापार्‍यांकडे प्लास्टिकच्या पिशव्यांमधून सामान दिले जात आहे. महापालिनेके प्लास्टिक वापरणार्‍यांवर धडक कारवाई सुरु केली होती. सहा महिन्यात प्लास्टिक वापरणार्‍या 141 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून सात लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, एक हजार 879 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. परंतु, सध्या कारवाई थंड झाल्याचे दिसून येत आहे. चिंचवड, निगडी परिसरात सर्राससपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. या प्लास्टिक वापरणार्‍यांवर पालिकेकडून तीव्र कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम 2006 नुसार नियमभंग केल्यास पहिल्या वेळी पाच हजार रुपये आणि दुसर्‍या वेळी दहा हजार रुपये दंडाची तरतूद असून तिसर्‍या वेळी पकडले गेल्यास 25 हजार रुपये व तीन महिन्यांची कैदेची तरतूद.

95 हजारांचा दंड वसूल
महापालिकेचे आरोग्य अधिकारी मनोज लोणकर म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक वापरणार्‍यांवर दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसात पिंपरी, काळेवाडी, रहाटणी या परिसरातील दुकांनाची तपासणी करण्यात आली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍या 19 दुकानांवर कारवाई करत 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच सलग 15 दिवस शहराच्या सर्व भागात प्लास्टिक बंदीची कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Copy