पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी जबाबदारी म्हणून पाण्याचे नियोजन करावे: विकास पाटील

0

पिंपरी:

पिंपरी-चिंचवडकरांना आज पाण्याच्या आणि प्रदूषणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी स्वतः पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी पुढे येऊन आपली जबाबदारी म्हणून पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच प्रदूषणाचे प्रमाण कसे कमी करता येईल त्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन इसिएचे चेअरमन विकास पाटील यांनी केले आहे.

चिंचवड शहराच्या विकासात गतिमानत १९७५ नंतर आली व आपल्या शहरातील पर्यावरणाच्या समस्या वाढत गेल्या आहेत. ज्यांनी १९७५ चे पिंपरी चिंचवड पाहिले असेल त्यांना फक्त ओसाड माळ आणि जागोजागी दगडाच्या खाणी आणि हवेत धुलीकण आणि सफेद काळपट वातावरण त्याच बरोबर स्टोन क्रशरचा आवाज, मोठ्या कंपन्यांच्या भोंग्यांचा आवाज , रस्त्यावरून तेलाचे थेंब सांडवत जाणारे ट्रक आणि सायकली, कंपन्याच्या बस, मुरूम माती खडी वाहणारे ट्रक व त्यातून रस्त्यावर सांडणारी माती आणि खडी सायकल स्वाराना कशी त्रासदायक व्हायची हे सर्व आठवत असेल.
प्राधिकरण निगडी म्हणजे सामसुम वस्ती व तेथे भूखंड विकत घ्यावा अथवा नको अशी मनात भीती असायची सुरक्षितेबाबत. पण आज चित्र बदलले आहे आपणास शहरात एक इंच जागा घेताना मोठी रक्कम मोजावी लागतेय म्हणूनच आपल्या शहरात अतिक्रमण हा विषय सुरु झाला आहे . शहरात पर्यावरण संवर्धना बाबत अपेक्षित काळजी प्रशासनाकडून घेतली नाही व काही ठिकाणी दुर्लक्ष जाणीव पूर्वक झाले हे आपणा सर्वांना मान्य आहे. शहर विकसित होताना अपेक्षित भविष्यातील सुविधा बाबतचे आराखडे चुकीच्या पद्धतीने मांडले गेले आणि अचानक शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे नागरी सुविधा अपुर्या पडू लागल्या आहेत त्यात पहिला नंबर लागतोय तो पिण्याच्या पाण्याचा.
आजपर्यत आपण फक्त पवना नदीवरील रावेत बंधार्यावर अवलंबून राहिलो नंतर आपण थेट पवना धरणातून बंद पाईपमधून पाणी आणण्याचा प्रयत्न केला पण राजकीय वैयक्तिक नांव लौकीकाच्या हव्यास पोटी तेथे काहीच घडले नाही व आपण स्वतःचे नुकसान करून घेतले आहे. आज रावेत अशुद्ध पाणी उपसा केंद्राची क्षमता अपुरी आहे त्यामुळे आपणास शहरात पाणी कमी पडते आहे. २०२० सालात चिखलीला नव्याने पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची पहाणी करतो आहोत व त्यात सुद्धा काही मंडळी काड्या/ मोडता घालण्याचे नेहमीचे घाणेरडे समाज अहिताचे प्रकार करण्यात रस घेत आहेत.हि नक्कीच खेदाची गोष्ट जाणवते.
आपल्याला पाणी कमी का पडत आहे याचा आपण कधी विचार केला आह्रे का ? रावेत मधील ४८० MLD पाणी पुरेसे आहे पण आपले शहर हे उंच व खोलगट अश्या जमिनीवर वसले आहे व आपण पाणी पुरविताना गुरूत्वाकर्षण पद्धतीने पाण्याच्या उंच टाक्यातून करतो आहोत त्यामुळे खोलगट भागात पाणी जास्त जाते व उंचावरील भागाला पाणी इतरांच्या तुलनेत पुरेसे मिळत नाही.. ( पाणी वाटपातील दोष )
पाणी शुद्धीकरण प्रकल्प सतत कार्यरत असल्याने त्या ठिकाणी कामाचा ताण ३६५*२४ असतो. यंत्रातील बिघाड आणि अखंडित वीजपुरवठा यांच्यावर आपण पूर्णपणे विसंबून आहोत. रावेत पाणी साठ्या बाबत आज पर्यंत कोणीही गंभीरतेने लक्ष दिले नाही सन २००२ च्या दरम्यान बंधार्याच्या आयुश्यमानाचा विषय इसिए ने शासना समोर नेला होता व त्याचा पाठपुरावा सातत्याने केल्याने जलसिंचन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग कडून ती डागडुजी नंतरच्या काळात केली होती त्या नंतर रावेत बंधार्यावर नागरिकांच्या कडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ लागले आहे. (कपडे धुणे, वाहन धुलाई, नदी पात्रातील हगणदारी आदी )
रावेत कडील नागरिक पुनावळे कडे जाण्यासाठी रहदारीचा रस्ता म्हणून ह्या बंधार्याचा वापर करीत आहेत आणि सुरवातीच्या २००२ च्या काळात बंधार्यावर एका बाजूला (पाण्याच्या साठ्या च्या बाजूला) लोखंडी सुरक्षा पाईप लावलेले होते त्यामुळे थोडीफार सुरक्षा जाणवत होती पण आता तर भंगार वेचकानी ते लोखंड कापून चोरून नेले आहे व आज तो बंधारा माणसांच्या वावरास आणि रहदारीस पूर्ण असुरक्षित बनला आहे . त्यामुळे तेथे दरवर्षी रावेत बंधार्यावर मनुष्य हानी होत आहे . महापालिका माणूस मेल्यावर त्याला शोधण्या साठी लाखो रुपये व यंत्रणा कामाला लावते आहे पण कोणतीही अशी घटना घडू नये या करीता कोणतेही सकारात्मक पाउल उचलत नाही हि बाब आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.
जे पाणी पीत आहोत ते जर आपण तपासले तर ते पहिले काही तास अगदी आरोग्यास योग्य आहे असे आढळते पण नंतर काही तासाने क्ल्रोरीन निघून गेल्यावर तेच पाणी आरोग्यास घातक आहे असे जाणवते. यातील तांत्रिक दोष खूप आहेत पण आत्ताच आपण एवढे खोलवर जाणे योग्य नाही. हे पाणी रावेत धरणातून उपसा केले जाते व नंतर आपल्या घरी शुद्ध करून पाठविले जाते त्यासाठी महापालिका अफाट खर्च करते व आपल्याला शुद्ध पाणी पुरविते ते आपल्या घरी येई पर्यंत खूप मोठा प्रवास करते व कधी कधी त्याच पाण्यात आळ्या / किडे आढळतात ते आपल्या चुकीच्या पद्धतीच्या हाताळणी मुळेच. आपला विषय आहे पाण्याच्या जलसाठ्यात रोज होणारे प्रदूषण जे आपल्याला सहज व लगेच थांबविता येण्यासारखे आहे. महापौर आणि आयुक्त फक्त रोज ऐकून घेतात विषय पण अध्याप काहीही परिस्थिती बदलत नाही .

पाण्याचे प्रदूषण थांबविण्याचा विचार मनात जरी आला तरी आपण शहरातील कित्येक गैरप्रकार थांबवू शकतो. वाहने वाशिंग करणारे सर्व उद्योग खराब पाणी बेधडक नाल्यात सोडतात कि ज्या पाण्यात Engine Oil तसेच इतर घातक रसायने पाण्या सोबत नदीत जातात व नदीतील जैव विविधता नष्ट होत आहे आणि त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. आपण जलपर्णी समस्येला आज कंटाळलो आहोत .त्या जलपर्णी बाबत सुद्धा खरे कारण बाजूला ठेवून फक्त आपण फेसबुक आणि प्रसार माध्यमातून घरबसल्या विविध विचार व्यक्त करतो आहोत प्रत्यक्षात कोणच विषय हाताळण्यासाठी येत नाही .

Copy