पिंपरीत आजपासून महाराष्ट्र दूध परिषद

0

मोफत चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन व प्रकल्प भेटीचे आयोजन

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रातील दूध उत्पादक दुधाशी संलग्न व्यवसायात यावा व त्याला सर्वप्रकारची तांत्रिक व इतर माहिती मिळावी यादृष्टीकोनातून महाराष्ट्र दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चासत्रे होणार असून अत्याधुनिक मशीनरींचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. येत्या शुक्रवार ते रविवार दरम्यान (12 ते 14 ऑक्टोबर) ही परिषद होत असून राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आनंद गोरड यांनी दिली.

रविवारपर्यंत ऑटो क्लस्टरमध्ये आयोजन
महाराष्ट्र दूध परिषद सर्वांसाठी मोफत आहे. पिंपरीतील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये होत असून तिचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. याप्रसंगी खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, संयोजक विष्णूकाका हिंगे, कुलदीप शर्मा, राजेंद्र कोकणे, डॉ. टी. के.वल्ली, कांतीलाल उमाप, ए. व्ही. गुप्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विविध कार्यशाळा, चर्चासत्र
दूध परिषदेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी लघु डेअरी प्रकल्प उभारणी, दूध प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ उत्पादन, गुणनियंत्रक व मशिनरीची देखभाल आणि दुभत्या जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन व शास्त्रीय पध्द्तीने संगोपन या विषयांवरील कार्यशाळा होणार आहे. शनिवारी दुभत्या जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन व शास्त्रीय पध्द्तीने संगोपन आणि पनीर, खवा उत्पादन व मिठाई उद्योग याविषयावर चर्चासत्र होणार आहे. दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन व आदर्श डेअरी फार्म व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्रकल्पास भेट दिली जाणार आहे. रविवारी दही, लस्सी, ताक, चक्का, श्रीखंड, आम्रखंड उत्पादन व मिठाई उद्योगाविषयी चर्चासत्र होणार आहे. अधिकाअधिक दूध उत्पादकांनी या दूध परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद गोरड यांनी केले आहे.

Copy