पाल हादरले : जन्मदात्याचा खून : आरोपी मुलास पोलिसांकडून अटक

रावेर : जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यात खाटेच्या माचल्याचा दांडका डोक्यात मारून खुन केल्याची घटना सोमवार, 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाल (ता.रावेर) येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली आहे. दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला (26) असे अटकेतील आरोपी मुलाचे तर अनाज्या भारत्या बारेला (75) असे मयत पित्याचे नाव आहे.

जेवणाच्या क्षुल्लक कारणावरून पित्याचा खून
पाल (ता.रावेर) येथे गट शेत शिवार गट नंबर 271 शेतात अनाज्या भारत्या बारेला (75) हे वास्तव्यास होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी त्यांचा मुलगा दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला (6) यास जेवण करून घेण्यास सांगितले. यावेळी दिनेशने काय केले आहे ? असे विचारले असता त्याच्या वडीलांनी उडीद दाळ व भाकरी केल्याचे सांगितले. उडीद दाळ व भाकरी केल्याचा राग येऊन दिनेशने वडील व बहिणीस चापटा-बुक्यांनी मारहाण केली. त्याचे वडील तेथून पळून जात असतांना दिनेश याने लाकडी खाटेच्या माचल्याच्या दांडक्याने वडील अनाज्या बारेला यांच्या तोंडावर व डोक्यावर तडाखा मारले. डोक्यावर घाव वर्मी लागल्याने अनाज्या यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बनाबाई नरसिंग बारेला यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी दिनेश बारेला विरोधात रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले व सहकारी करीत आहेत.

Copy