Private Advt

पाल भागात दहा वर्षीय गुराख्यावर वाघाचा हल्ला

पाल भागातील कंपार्टमेंट 61 मधील घटना : वाघाच्या वावराने शेतकर्‍यांसह शेतमजुरांमध्ये पसरली भीती

रावेर : तालुक्यातील पाल भागातील कंपार्टमेंट 61 मध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय बालकांवर वाघाने प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला असून ही घटना बुधवार, 1 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. दीपला बारेला (10) असे जखमी बालकाचे नाव आहे.

वाघाच्या हल्यात बालक जखमी
मांजल येथील गुराखी दीपला बारेला मित्रासोबत दररोजप्रमाणे शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीतील कं.नं. 61 मध्ये गेले होता. याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने आधी शेळीवर हल्ला चढवला व नंतर गुराखी दीपला बारेला याच्यावर हल्ला चढवला. गुराख्या नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर हल्ला करण्यात आल्याने बालक गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत सोबतच्या गुराख्यांनी गावाकडे धाव घेत गावात जाऊन घडला प्रकार सांगितला. ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले तो पर्यंत बालकाला गंभीर जखमी करून वाघ पसार झाला. यानंतर वडील माल्या बारेला व ग्रामस्थांनी जखमीला दुचाकीवर तत्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी केले.

प्रकृती खालावल्याने बालक उपचारार्थ जळगावात
दीपल्या बारेला याच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. यावेळी त्याला पाणी पाजण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने वडील माल्या बारेला याने स्वतःच्या नाल्यातून पाणी आणून पाजले व जखमी अवस्थेत दुचाकीवर 12 किलोमीटर पाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी मुलाच्या दोन्ही हातावर आणि पायावर वाघाची नखे लागली असून डोक्यावरची कवटी फुटल्याने सिटी स्कँन करण्यासाठी व पुढील उपचार करण्यासठी जळगाव येथे रवाना केले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली. वाघाने हल्ला केल्याने या परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.