पालिकेत विषय समित्यांमध्ये महिलाराज

0

भुसावळ । पालिकेची विषय समिती सभापती निवडीसाठी शनिवार 4 रोजी विशेष सभा पालिका सभागृहात झाली. पीठासीन अधिकारी मिनाक्षी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली. शहराचा विकास करण्यासाठी पालिकेला विविध विकास कामांचे नियोजन करणे सोयीचे जावे यासाठी या समित्यांच्या माध्यामातून कामकाज केले जाते. यात बांधकाम, शिक्षण, आरोग्य, महिला आणि पाणी पुरवठा या पाच समित्यांच्या सभापतींची निवड झाली. त्यापैकी केवळ पाणी पुरवठा समितीचे सभापतीपद हे किरण कोलते यांना मिळून राहिलेल्या इतर चारही समित्यांचा कारभार हा महिला नगरसेविकांकडे सोपविण्यात आला आहे.

सभापतीपदी यांची करण्यात आली निवड
पालिका सभागृहात पिठासीन अधिकारी मिनाक्षी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत बांधकाम समिती सभापती प्रतिभा पाटील, शिक्षण समिती सभापतीपदी शैलजा नारखेडे, आरोग्य समिती सभापती दिपाली बर्‍हाटे, पाणी पुरवठा सभापती किरण कोलते, नियोजन विकास समिती सभापती युवराज लोणारी, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बत्रा यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे दहा सदस्य असलेल्या स्थायी समिती सभापतींची निवड देखील करण्यात आली. स्थायी समितीमध्ये उपनगराध्यक्ष युवराज लोणारी हे नियोजन व विकास समितीचे पदसिध्द सभापती तर नगराध्यक्ष रमण भोळे हे पदसिध्द सभापती आहेत. तर सदस्यांमध्ये प्रतिभा पाटील, शैलजा नारखेडे, दिपाली बर्‍हाटे, किरण कोलते, पुष्पा बतरा, प्रा. दिनेश राठी, प्रमोद नेमाडे, दुर्गेश ठाकूर यांचा समावेश आहे.

सभेला यांची होती उपस्थिती
यावेळी बाजारपेठ पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त राखला. याप्रसंगी सहा नगरसेवक गैरहजर होते. निवड झालेल्या सभापतींचा सत्कार मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर व नगराध्यक्षांनी केला. सभेला भाजपा गटनेता मुन्ना तेली, प्रा. सुनिल नेवे, रमेश नागराणी, महेंद्रसिंग ठाकूर, मुकेश पाटील, बोधराज चौधरी, रविंद्र सपकाळे, मुकेश गुंजाळ, रविंद्र खरात, पुष्पा सोनवणे, मंगला आवटे, नुरजहा खान, मेघा वाणी आदी नगरसेवक
उपस्थित होते.

जनाधारचा विरोध विरला
यावेळी जनाधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे यांनी पीठासीन अधिकार्‍यांना आजची विशेष सभा तहकूब करण्यात यावी असे निवेदन दिले. मात्र पीठासीन अधिकार्‍यांनी सदर विषय सभा हि नियमाप्रमाणेच होत असून हि सभा रद्द करण्यात येणार नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकार्‍यांनी सदर निवेदन आधीच निकाली काढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावर पगारे यांनी उच्च धाव घेणार असल्याचे सांगितले. याआधी गटनेता पगारे यांनी भुसावळ नगरपालिका ही ‘अ’ दर्जाची पालिका असून विषय समितीमध्ये फक्त निवडून आलेल्या नगरसेवकांनाच सदस्य होता येते. तरीदेखील यात स्विकृत नगरसेवकांना सदस्य घेतले आहे. विषय समिती सदस्यांमध्ये स्विकृत नगरसेवकांचा सहभाग घेतल्याने समिती सदस्यांची निवड रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. परंतु यासंदर्भात कुठलीही कारवाई न झाल्याने 4 रोजीची सभा स्थगित करण्याची मागणी जनाधार विकास पार्टीतर्फे करण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी त्यांची हि मागणी फेटाळून लावली असल्याचे समजते. त्यामुळे जनाधार विकास पार्टीच्या या विरोधाचा काही एक फायदा झाला नसल्याचे दिसून आल्याने निवडणूक प्रक्रिया हि शांततेत पार पडली.