पालिकेच्या विकासकामांना सुरुवात

0

भुसावळ । शहरातील बहुप्रतिक्षीत व अतिशय दयनिय अवस्था झालेल्या वरणगाव रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली असून शिवाजी नगरपरिसरात रस्त्याच्या कामास गती मिळाली आहे. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते शुक्रवार 3 रोजी उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे याप्रसंगी जनाधार पार्टीच्या नगरसेविका पुजा सुर्यवंशी यांची उपस्थिती असल्याने सत्ताधार्‍यांनी विरोधकांनाही सोबत घेऊन काम करण्यास प्राधान्य दिले असल्याचे दिसून येते. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेते मुन्ना तेली, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, वसंत पाटील, प्रमोद सावकारे, नंदा निकम, महेंद्रसिंग ठाकुर, जनाधार पार्टीच्या नगरसेविका पुजा सुर्यवंशी, राजू सुर्यवंशी, निर्मल कोठारी, गिरीश महाजन, राजू नाटकर, राजेंद्र आवटे, राहुल बोरसे उपस्थित होते. वरणगाव रस्ता म्हणजे शहराला लागलेले ग्रहणच समजले जायचे मात्र सत्तांतरानंतर नगराध्यक्षांनी सर्वप्रथम रस्त्यांच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्याचा प्रयत्न केला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

निधी मिळवून देणार
पालिकेला विकासाच्या कामासाठी लागणारा जो काहीही निधी आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन भुसावळ पालिकेेला देण्याचा प्रयत्न केला जाईल. माझ्या निधीसह आमदार एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून भुसावळ शहराला सुशोभिकरणासाठी जो काही खर्च लागेल तो निधी आम्ही गोळा करुन शहरातील समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचेही आमदार संजय सावकारे यांनी या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.

जाहीरनाम्यातील मुद्दे पूर्ण करण्यास प्राधान्य
शहरात गेल्या 15 वर्षांपासून वरणगाव रस्त्याची दुरावस्था झाली होती. निवडणुकीत भाजपाने रस्त्या संदर्भात जाहिरनाम्यात उल्लेख केला होता. त्यामुळे पहिले प्राधान्य देऊन सर्वप्रथम या कामाला आमदारांच्या हस्ते उद्घाटन करुन सुरुवात करण्यात आले. तसेच शहरातील इतर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी येणार्‍या बैठकीत विषय घेवून त्याला तात्काळ मंजुरी मिळून निवेदन काढल्यानंतर शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे नगराध्यक्ष भोळे यांनी सांगितले.

सर्वांना सोबत घेणार
विकासाच्या कामासाठी जे सोबत येतील त्यांनी कुठलाही पक्षपातीपणा न करता आम्ही सोबत घेऊ शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठी नागरिकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे पालिकेमार्फत नागरिकांच्या मुलभूत गरजा कशा पुर्ण करता येथील याकडे लक्ष दिले जात आहे. शहराचे नावलौकिक करण्याचेे कार्य आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवक करीत असल्याचे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी सांगितले.