पालिका विद्यार्थ्यांसाठी दिल्लीचे शिक्षक!

0
दिल्ली महापालिकेसोबत झाला शैक्षणिक करार
नकारात्मक भूमिका काढण्यासाठी शिक्षकांनही प्रशिक्षण मिळणार
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतील शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच शिक्षकांचा वर्ग घेण्यात येणार आहे. शिक्षकांची नकारात्मक भुमिका असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात पालिकेच्या शाळामागे राहिले आहेत. त्यामुळे शिक्षकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे महापौर राहुल जाधव म्हणाले. तसेच दिल्ली महापालिका आणि पिंपरी महापालिकेमध्ये शैक्षणिक करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी दिल्लीतील शाळा पाहणी दौरा केला. त्यानंतर दौर्‍याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात दहा शाळा
महापौर म्हणाले, ‘दिल्ली महापालिका शाळांना ज्या सुविधा देते, त्याच सुविधा पिंपरी महापालिका देखील शाळांना देत आहे. दिल्लीतील शिक्षकांची मानसिकता सकारात्मक आहे. पिंपरी पालिकेच्या शिक्षकांची मानसिकता नकारात्मक असून त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यशाळा घेण्यात येईल. शाळांचा गुणवत्ता, दर्जा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्व शिक्षकांना सोयी-सुविधा दिल्या जातील. स्मार्ट सिटीत सहा शाळांचा समावेश केला होता. त्यामध्ये आणखी चार शाळांचा समावेश करुन दहा शाळांची पहिल्या टप्यात सुधारणा केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्यात उर्वरित शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत’.
स्मार्ट शिक्षणाची गरज
सभागृह नेते पवार म्हणाले, ‘दिल्लीतील शाळांमध्ये स्मार्ट क्लास रुम, स्मार्ट ग्रंथालयाची सुविधा आहे. त्यानुसार पिंपरी पालिकेतील शाळांमध्ये देखील सुधारणा केली जाणार आहे. दिल्ली महापालिका आणि पिंपरी महापालिकेमध्ये शैक्षणिक करार केला जाणार आहे’. विरोधी पक्षनेते साने म्हणाले, ‘शहरातील गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने तातडीने दिल्लीतील शाळांच्या उपक्रमांची अंमलबजावणी सुरु करावी. स्मार्ट सिटीत आणखीन चार शाळांचा समावेश करण्यात यावा’. कलाटे म्हणाले, महापालिकेतील शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. दिल्लीतील शाळांमध्ये स्मार्ट शिक्षण देण्यावर भर आहे. महापालिकेने देखील स्मार्ट शिक्षण द्यावे.
Copy