पालिका करणार विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता जनजागृती

0

भुसावळ : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेल्या काही दिवसांपासून वार्ड निहाय स्वच्छता अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून स्वच्छता विषयक जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भात बुधवार 28 रोजी पालिकेत पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी डि.टी. ठाकूर, संतोष सराफ यांच्यासह शहर स्वच्छता समितीचे सदस्य आणि नगरपालिका प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

शहरातील 14 शाळांचा सहभाग
येत्या 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून म्युनिसिपल हायस्कुल येथे विविध स्पर्धा दुपारी 3 वाजता घेण्यात येतील. निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धामध्ये शहरातील एकूण 14 शाळा व महाविद्यालय सहभागी झाले आहेत. त्यात डि.एल. हिंदी विद्यालय, बियाणी इंग्लिश स्कुल, डि.एस. हायस्कुल, म्युनिसिपल हायस्कुल, एम.आय. तेली उर्दू हायस्कुल, प.क. कोटेचा माध्यमिक विद्यालय, सेंट अलॉयसिअस हायस्कुल, बज्मे इरकते उर्दू हायस्कुल, सुशिलाबाई छबीलदास चौधरी माध्यमिक विद्यालय, साने गुरूजी माध्यमिक विद्यालय, हाजी अजीज पहेलवान उर्दू स्कुल, सु.ग. टेमाणी विद्यालय, सु.ग. टेमाणी ज्युनिअर कॉलेज, आर.एस. आदर्श हायस्कुल या शाळांचा समावेश आहे.

स्पर्धेसाठीचे विषय
निबंध स्पर्धेसाठी स्वच्छता अभियानात माझे योगदान, माझी स्वच्छ शाळा, स्वच्छ भारत उद्याचा सुंदर भारत हे विषय राहतील. वक्तृत्व स्पर्धेसाठी शौचालय ज्याचे दारी आरोग्य नांदेल त्याचे घरी, अस्वच्छता एक कलंक, अस्वच्छतेचा भस्मासूर हे विषय तर चित्रकला स्पर्धेसाठी शालेय परिसर श्रमदानातून स्वच्छ करणारे विद्यार्थी, स्वच्छता जनजागृती रॅली, उद्याचे स्वच्छ भुसावळ शहर हे विषयी राहणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी डि.टी. ठाकूर, सदस्य राजश्री सपकाळे, रमण भोळे, डॉ. जगदीश पाटील, आर.डी. शर्मा, पी.डी. पाटील, शेख अय्युब, नितीन अडकमोल, सिमा भारंबे, शेख महंमद इरफान, हमीद शेख यांचा समावेश आहे.