पालघर हत्याकांड प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करणार : उध्दव ठाकरे

0

मुंबई – पालघरमधील एका गावात लोकांना दोन साधूंसह चालकाला ठार मारल्याची घटना गुरुवारी घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलीस कर्मचार्यांवर हल्ला करणार्‍या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी ट्विटरवरून याप्रकरणी माहिती दिली. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील १०१ जणांची अटक केली गेली आहे व उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे, असे दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

घटना ही अतिशय गंभीर आणि अमानवीय – फडणवीस

पालघरमधील घटना ही अतिशय गंभीर आणि अमानवीय आहे. आज देश एका गंभीर परिस्थितीला सामोरा जात असताना तर हा प्रकार आणखी व्यथित करणारा आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पोलिसांच्या समोर जमाव लोकांना ठेचून मारतो, पोलिसांच्या हातातील साहित्य हिसकावून घेऊन त्यांना मारले जाते ही सर्वात मोठी लाजीरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.