पालकांनो सावधान ! मोबाईल मुलांचे डोके हँग करतो आहे -प्रेरणादायी प्रशिक्षक नामदेव बेलदार

0

उमंग समाजशिल्पी महिला परीवारातर्फे स्मरणशक्ती, मेंदू विकास व विचार मार्गदर्शनपर कार्यशाळा

चाळीसगाव- आमदार उन्मेश पाटील प्रेरीत उमंग समाजशिल्पी महिला परीवार आणि जिनिअस माइंड अंतर्गत मोफत स्मरणशक्ती, मेंदू विकास व विचार क्षमता वाढविण्याच्या पद्धती यावर मार्गदर्शनपर सेमिनार राजपूत मंगल कार्यालय येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथी आमदार उन्मेश पाटील, प्रशिक्षक नामदेव बेलदार, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा संपदा पाटील, बेलदार समाज राज्यध्यक्ष साहेबराव कुमावत, सुवर्णाताई राजपूत, सुरेखा बेलदार, अनिल कुमावत आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आमदार उन्मेश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना सांगितले की, प्रत्येक व्यक्ती युनिक असून प्रत्येकाला सारखा मेंदू आहे. पण प्रत्येकाची विचार क्षमता वेगवेगळी आहे. त्यामुळे पालकांनी मुलांची विचार क्षमता ओळखून त्या दिशेने मुलांना घडवून चाळीसगावचे नाव देश-विदेश स्तरावर न्यावे. कुणीही जन्मजात हुशार नसत परंतु आपल्या मेंदूला चालना देवून मुलांच्या विचार शक्तीला प्रोत्साहन द्यावे. आज कुठेही जादूची कांडी नाही की ती फिरवल्यावर लगेच सर्व हुशार होतील किंवा आपली बुद्धी दुप्पट-तिप्पट होईल. प्रयोगातून विज्ञान या संकल्पनेतून मुलांमधील कौशल्य पाहून त्यांना विविध स्तरावर, कौशल्यात पारंगत करण्याची जबाबदारी पालक, शिक्षक यांच्यावर असून यातून सुज्ञ समाज निर्मितीस वाव मिळेल. कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून जिनिअस माइंड चे संचालक प्रेरणादायी प्रशिक्षक नामदेव बेलदार यांनी विद्यार्थ्यांशी सोप्या भाषेत संवाद साधून विद्यार्थ्यांना मेंदू विकासाच्या दृष्टीने वैज्ञानिक अभ्यास कौशल्याचा आपल्या दैनंदिन अभ्यासात कसा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले. यात विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमाचा (प्रोजेक्टर) वापर करून मेंदूच्या रचनेत डावा व उजवा मेंदू काम कसा करतो ते मेंदू विज्ञानाच्या माध्यमातून स्मरणशक्ती कशी वाढवावी, माहिती ओळख, माहिती साठवण, अभ्यासाचे तत्व, आवड, कल्पक विचार, साखळी पद्धत, कौशल्य इ.विषयी माहिती दिली. मुलांना प्रश्नोत्तरे विचारून, छोटे-छोटे प्रयोग करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, मेंदू विकास, विचार शक्ती वाढवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची भिती कशी घालवायची याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामिनी वाघ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फैय्याज शेख, सुहास पाटील, अर्जुन पाटील, विजया पाटील, विजया भोकरे, यांचे सहकार्य लाभले. या सेमिनारला चाळीसगाव तालुक्यातील सर्वच मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक मोठ्या संख्येत सहभागी झाले.