पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, यंत्रणेत समन्वय गरजेचा

0

भुसावळ : भुसावळातील दोघा कोरोनाबाधीतांचा शुक्रवारी रात्री मृत्यू ओढवल्यानंतर व शहरातील कोरोनाबाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत अधिकार्‍यांचे कान टोचले शिवाय कठीण काळात यंत्रणेत समन्वय असणे गरजेचे असल्याचेही सांगितले.

विनाकारण फिरणार्‍यांवर गुन्हे दाखल करा -पालकमंत्री
शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त करीत उपस्थित अधिकार्‍यांकडून रुग्णांबाबत आढावा घेतला. याप्रसंगी जामनेर रोड बंद करण्यात आल्याने व याच भागात 75 टक्के दवाखाने या भागात असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून दवाखाने सुरू ठेवण्याची सूचना केली तसेच विनाकारण बाहेर फिरणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या उपस्थित अधिकार्‍यांना सूचना केल्या. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलिस प्रशासनाच्या अडचणींबाबत माहिती जाणून घेतली. कोरोना नियंत्रीत येण्यासाठी अधिकारी, प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय गरजेचा असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मुख्याधिकार्‍यांबाबत तक्रार
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी मुख्याधिकार्‍यांच्या कार्यपद्धत्तीबाबत तक्रार केली. मुख्याधिकारी करुणा डहाळे या एकाही नगरसेवकांचा फोन घेत नाहीत, असे त्यांनी सांगितले शिवाय ज्या प्रभागात रुग्ण आढळला त्या भागातील नगरसेवकांशी समन्वय साधायला पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी मांडली. पालकमंत्र्यांनी या नंतर मुख्याधिकार्‍यांना जामनेर रोडवरील गर्दीबाबत विचारणा करीत पालिकेचे कर्मचारी नेमके काय काम करतात? याबाबत विचारणा करीत कारवाईच्या सूचना दिल्या.

यांची होती बैठकीला उपस्थिती
बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी गजानन राठोड, पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, नगरसेवक पिंटू कोठारी, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक यतीन ढाके आदींची उपस्थिती होती.

Copy