पार्थिवशी स्पर्धा नाही, क्षमतेवर पुन्हा स्थान मिळवेन

0

कोलकता : भारतीय कसोटी संघातले माझे स्थान घेणाऱ्या पार्थिव पटेलशी माझी स्पर्धा नाही, स्वतःच्या क्षमतेवर संघात पुन्हा स्थान मिळवेन. त्यासाठी शुन्यातून सुरवात करायची माझी तयारी आहे, असा विश्‍वास बंगालचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने व्यक्त केला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील केवळ दोन सामने साहा खेळू शकला होता. दुखापतीमुळे त्याच्याऐवजी संधी देण्यात आलेल्या पार्थिवने यष्टिरक्षणाबरोबर फलंदाजीतही चमक दाखवून निवड समितीसमोर पेच निर्माण केला आहे.

मी विचार करत नाही
तंदुरुस्त झालेल्या साहाने मोहन बगानच्या मैदानावर कसून सराव सुरू केला. फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत स्थान मिळवण्यासाठी त्याने तयारी सुरू केली आहे. साहा म्हणाला, ‘‘इंग्लंडविरुद्ध केवळ दोन सामने खेळल्यानंतर दुखापतीमुळे मला संघाबाहेर जावे लागले आणि पार्थिवची वर्णी लागली त्याने चांगला खेळ केला आणि संघही जिंकला हे चांगले आहे. चांगली कामगिरी करणे आणि तंदुरुस्त रहाणे हे माझे काम आहे संघ निवडीची जबाबदारी निवड समितीची आहे, त्यामुळे मी त्याचा विचार करत नाही, माझ्या प्रमाणे पार्थिवनेही सर्वोत्तम योगदान दिले आहे.

माझ्या क्षमतेवर विश्‍वास
जे योग्य वाटेल ते निवड समिती करेल मला कशाबद्दलही खेद नाही, मी कोणाशी स्पर्धा करत नसून मला माझ्या क्षमतेवर विश्‍वास आहे, असेही साहाने नम्रपणे सांगितले. दुखापत होण्यापूर्वी साहाने दोन सामन्यांत मिळून ४९ धावा केल्या होत्या, तर पार्थिवने तीन सामन्यांत ६५ च्या सरासरीने १९५ धावा काढल्या. साहाने गुरुवारीही नेटमध्ये चांगला सराव केला. आणि तंदुरुस्तीबाबत आत्मविश्‍वास व्यक्त केला. मी राष्ट्रीय अकादमीत तंदुरुस्तीचा सराव केला, पण नेटमध्ये फलंदाजी केली नव्हती. पण एकूणच आता तंदुरुस्तीबाबत चिंता नाही, असे साहाने स्पष्ट केले.