पार्टीसाठी घरफोडी करणार्‍या तिघांच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या

0

वाघुळदे नगरात केली होती घरफोडी: तिघांना 24 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

जळगाव : शहरातील दूध फेडरेशन परिसरातील वाघुळदे नगरातील घरफोडी करुन एलसीडी टीव्ही, मोबाईल, बॅग, बँकेचे पासबुक, दान पेटी व इतर साहित्य लांबविणार्‍या तीन संशयितांना शनिवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंडे (25), पंकज उर्फ गोलु समुद्रे (22) व मिलिंद उर्फ आप्पा भिका व्यहाळे (28) सर्व रा.राजमालती नगर, दूध फेडरेशनजवळ अशी तिघा संशयितांची नावे आहेत. मद्यप्राशनासह, मासांहारी जेवणाची पार्टी करण्यासाठी तिघांनी चक्क घरफोडी केल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे.

रेल्वे रुळाकडे पार्टीला बसताच, तिघे ताब्यात
सुरत रेल्वे गेट परिसरात काही तरुण रोज दारु,मांसाहाराची पार्टी करतात व या पार्टीसाठी घरफोडी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार बकाले यांनी उपनिरीक्षक रवींद्रसिंग गिरासे, सहायक फौजदार विजय पाटील, अशोक महाजन, संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन व अशोक पाटील यांचे पथक सलग 48 तास दूध फेडरेशन, सुरत रेल्वे गेट या भागात कार्यरत ठेवले. शनिवारी रात्री तीन जण रेल्वे रुळाकडे पार्टीला बसले अन् काही क्षणातच या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

तिघांची स्वतंत्र चौकशी घरफोडी केल्याचे आले समोर
तिघांनी स्वतंत्ररित्या चौकशी केली असता त्यांनी वाघुळदे नगरातील यश संजय ठाकूर यांच्या घरातून एलसीडी टीव्ही, मोबाईल, बॅग, बँकेचे पासबुक, दान पेटी व इतर साहित्य लांबविल्याची कबुली दिली व जेथे हे साहित्य ठेवले होते तेथून काढून दिले. दरम्यान, पोलिसांनी अधिकची चौकशी केली असता यश ठाकूर यांच्याकडे खरोखर 3 नोव्हेंबरच्या पहाटे चोरी झाल्याचे समजले व त्याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ठाकूर यांना चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या साहित्याची पडताळणी केली असता त्यांनी ते ओळखले आहे. तिघांनी पुढील कार्यवाहीसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहर पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले, तिघा संशयितांना 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Copy