Private Advt

पारोळ्यात प्रौढाची अंगठी घेवून भामटा पसार

पारोळा : तुम्हाला मी ओळखतो, माझे लग्न असून तुमच्या बोटातील अंगठीसारखीच अंगठी मलादेखील बनवायची आहे, असे म्हणून एकाने प्रौढाचा विश्वास संपादन करून 21 हजारांची अंगठी घेवून धूम ठोकली. पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वीरभान भिकन पाटील (47, रा.जोगलखेडा, ता.पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार, 10 एप्रिल 2022 दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ते नगरपालिका चौकात भाजीपाला घेत होते. त्याचवेळी तिथे एक अनोळखी इसम जवळ आला आणि म्हणाला की, मी तुम्हाला चांगले ओळखतो. माझे लग्न आहे, मला तुमच्या बोटातील अंगठीसारखी अंगठी बनवायची आहे. ती तुम्ही मला काढुन दाखवा. त्यानंतर वीरभान यांनी त्या अनोळखी व्यक्तीला 21 हजारांची सोन्याची अंगठी काढुन दाखवली. त्यावर तो अनोळखी व्यक्ती त्यांना म्हणाला की, मी सोनाराला दाखवुन येतो. बराच वेळ वीरभान यांनी अनोळखी वाट बघितली परंतु तो परत आला नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वीरभान पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास नाईक योगेश जाधव करीत आहेत.