पारोळ्यातील बँक ऑफ बडोद्याच्या मॅनेजरसह पंटर सीबीआय जाळ्यात

0

भुसावळ (गणेश वाघ) : पीक कर्ज मंजूर करण्यासाठी 75 हजारांची लाच घेणे पारोळ्यातील बँक मॅनेजरसह पंटरच्या अंगलट आले आहे. दोघाही आरोपींना पुण्यातील सीबीआयच्या पथकाने गुरुवारी अटक केल्याने बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे शिवाय बँकांमध्ये शेतकर्‍यांची होणारी लूटही या माध्यमातून उघड झाली आहे. मॅनेजर किरण ठाकरे व खाजगी पंटर नरेंद्र गणेश पाटील अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

बेअर चेकद्वारे घेतली लाच : घबाडही सापडले
पारोळा तालुक्यातील एका तक्रारदार शेतकर्‍याच्या एकूण चार लोन फाईलीसाठी बँक मॅनेजर किरण ठाकरे यांनी आठ टक्क्यांप्रमाणे लाच मागितली होती तर खाजगी पंटर नरेंद्र पाटीलने 25 हजारांची लाच मागितल्यानंतर एकूण 75 हजारांची लाच देण्याचे निश्‍चित करण्यात आले. शेतकर्‍याचे लोन सात लाख 10 हजार मंजूर झाल्यानंतर बुधवारी लाच देण्यासाठी तो बँकेत गेला मात्र आरोपींनी रोकड स्वरूपात लाच न स्वीकारता शेतकर्‍याकडून बेअरर चेक लिहून घेतला व गुरुवारी वटवला. त्यातील 25 हजार पंटरने तर 50 हजारांची रक्कम मॅनेजरने ठेवून घेतली.

बुधवारी पुण्यात गुन्हा दाखल
लाचेची पडताळणी बुधवारी करण्यात आल्याने बुधवारीच पुण्यात सीबीआयने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता बँक मॅनेजरच्या घरात तब्बल दहा लाखांची रोकड आढळल्याने ती जप्त करण्यात आली. ही कारवाई पुणे सीबीआयचे निरीक्षक आनंद रूहीकर व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

Copy