पारोळ्याजवळ एसटी बसला लक्झरीची धडक ; तीन जण जखमी, चालक पसार

0

लक्झरीचालकाविरुद्ध गुन्हा ; हिरापूर फाट्याजवळील घटना

पारोळा- एस.टी.ला मागून धडक दिल्याने लक्झरी बसमधील तीन जण जखमी झाले. या अपघातानंतर लक्झरीचालक पसार झाला असून त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास म्हसवे शिवारातील हिरापूर फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली. यासंदर्भात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बसचालक साबीस तस्लिम मलिक (38, रा.मेहरुण, जळगाव) यांनी फिर्याद दिली. ते जळगाव आगारातून जळगाव ते धुळे (बायपास, क्र.एम.एच. 40 एन. 9835) विनाथांबा व विनावाहक बस घेऊन जात होते. एरंडोलकडून पारोळ्याकडे येताना समोरुन कंटेनर ओव्हरटेक करीत होता. याप्रसंगी ट्रकवरील चालकाने लाइट दर्शवल्यामुळे बसला थांबवली असता मागून येणार्‍या लक्झरी बस (क्र.एम.एच. 19 वाय. 7071) ने जोरदार धडक दिली. त्यामुळे लक्झरी बसमधील लक्ष्मण रुपसिंग भील (वय 44, रा.खडके, ता.अमळनेर), लताबाई संजय पाटील (वय 38, रा.जळगाव) व वंदना डिगंबर साळवे (वय 30, रा.आर्वी, ता.धुळे) यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. या अपघातात लक्झरी व एस.टी.चे देखील नुकसान झाले आहे. तर लक्झरी बसचालक शालिक रामदार हटकर (रा.तांबापूर, जळगाव) पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.