पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करा – प्रांताधिकारी हेमंत निकम

0

बारामतीत दुष्काळ निवारण आढावा बैठक

बारामती : बारामती तालुक्यात दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाई आहे. तालुक्यात पाणी उपलब्ध होण्याचे मार्ग विचारात घेता पाण्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केले. प्रशासकीय भवन येथे घेण्यात आलेल्या दुष्काळ निवारण आढावा बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. गोसावी, तालुका कृषी अधिकारी पडवळ, विश्‍वास ओहोळ, जगताप, सानप, शिंदे आदींसह जलसंधारण विभाग, महावितरण विभाग, पाटबंधारे विभाग व इतर सर्व शासकीय विभागातील अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करा

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टँकर आवश्यकतेबाबत अंदाजित आराखड्याचा रंगीत नकाशा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. टँकर भरण्यासाठी उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतावर उन्हाळ्यात अतिताण आल्यास नगरपालिकेकडील साठवण तलावांच्या ठिकाणी टँकर भरण्याची व्यवस्था करावी, असे निकम यांनी सांगितले. प्रशासनातील सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही निकम यांनी केले.

अधिकार्‍यांशी समन्वय साधा

जानाई योजनेवर अवलंबून असलेली 13 गावे व शिरसाई योजनेवर अवलंबून असलेल्या 9 गावांसाठी 250 एम.सी.एफ.टी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे पाणी सर्व गावच्या संबंधित पाणी पुरवठा तलावात साठविण्यात येणार असून त्याचा वापर फक्त पिण्यासाठीच करण्यात यावा. ज्या तलावात पाणी साठवणार आहे त्या तलावामधून शेतीसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी देण्यात आलेल्या विद्युत जोडण्यांची यादी ग्रामसेवकांनी तयार करून ती विद्युत वितरण विभागाला द्यावी. विद्युत वितरण विभागाने त्या जोडण्या तात्काळ खंडीत कराव्यात. यामध्ये हलगर्जी झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे निकम यांनी सांगितले. तसेच रोहयोअंतर्गतच्या कामांबाबत तालुक्यातील सर्व कार्यन्वीत यंत्रणांनी जास्तीत जास्त कामे घेण्याबाबत नियोजन करावे. पशुधन विकास अधिकार्‍यांनी तालुका कृषी अधिकार्‍यांशी समन्वय साधून चारा टंचाईचेही नियोजन करावे, अशा सूचना निकम यांनी यावेळी केल्या.

Copy