पाणी भरतांना मोटारीचा शॉक लागून हरिविठ्ठल नगरात एकाचा मृत्यू

0

जळगाव – पाणी भरत असतांना मोटारीमुळे विजेचा जोरदार धक्क्याने प्रकाश रामधन पवार वय 56 रा. हरिविठ्ठल नगर यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.

जुना आठवडे बाजार परिसरात प्रकाश पवार हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. पत्नी धुणीभांडीचे काम करत असल्याने त्या कामासाठी नेहमीप्रमाणे गेलेली होती. घरी पवार तसेच त्यांची वृध्द आई हे दोघेच होते. हरिविठ्ठल नगर परिसरात सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी 11.30 वाजेच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. यामुळे पवार यांनीच पाणी भरण्यासाठी मोटार लावली. मोटार लावण्यानंतर काही वेळाने मोटारीची नळी निघाली. ती पुन्हा मोटारीला लावत असतांना पवार यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात ते दूरवर फेकले गेले. शेजार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या परिसरात पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार यांनी घटनास्थळ गाठले. व तत्काळ प्रकाश पवार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हरिविठ्ठल स्टॉपवर होते सलूनच दुकान
जामनेर तालुक्यातील भराडी येथील मूळ गाव असलेले प्रकाश रामधन पवार हे गेल्या दहा ते 12 वर्षापासून जळगावातील हरिविठ्ठल नगरात जुना आठवडे बाजार परिसरात स्थायिक झाले होते. त्यांचे हरिविठ्ठल रिक्षा स्टॉपवर सलूनचे दुकान होते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागवित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी शालीनी, आई, सखुबाई व मुलगा शुभम व भाऊ राजेंद्र पवार असा त्यांचा परिवार आहे. शुभम हा पुण्याला वास्तव्यास आहे. तर राजेंद्र पवार यांचेही हरिविठ्ठल नगरात सलूनचे दुकान आहे.