पाणीपुरवठ्यासाठी सत्ताधार्‍यांचेच आंदोलन

0

मुंबई । ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर आणि 27 गावाला वाढीव पाणी पुरवठा मिळावा, या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांनी विधानभवना बाहेरच्या पायरीवर ठियया आंदोलन केले. 27 गावांच्या पाणी टंचाईविषयी बुधवारी जनशक्तिने वृत्त प्रकाशित केले होते.

शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर, बालाजी किणीकर, रवींद्र फाटक, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक आदींनी विधानभवनाच्या बाहेर पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. उल्हासनगरला 50 एमएलडी, अंबरनाथ बदलापूरला 30 एमएलडी तर 27 गावांना 50 एमएलडी वाढीव पाणी पुरवठा मिळावा, असा त्यांनी जोरदार मागणी आमदारांनी केली. शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे आंदोलन सुरू असतानाच मागील पायरीवर उभे होते. 27 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 27 गावांना 30 ते 35 एमएलडी पाणी पुरवठा होत असून तो 50 एलएलडी वाढवून मिळावा, अशी मागणी आहे. वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर होऊनही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे 27 गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विधानभवनात बैठक
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव पाणी पुरवठा संदर्भात निर्णय घेतला आहे मात्र त्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यासंदर्भात गुरूवार 9 मार्च रोजी विधानभवनात बैठक होणार आहे अशी माहिती आमदार सुभाष भोईर यांनी जनशक्तीशी बोलताना दिली.