पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयावरून पदाधिकार्‍यांमध्ये रंगला कलगीतुरा

0

योजनेचे श्रेय आपले -जि.प.सदस्य रवींद्र पाटलांचा दावा : केंद्रासह राज्याची योजना, जि.प.सदस्यांचा संबंध नाही -आमदार संजय सावकारे

भुसावळ- भुसावळ ग्रामीणसह साकेगाव व कंडारी येथील पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच ही योजना आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी केला आहे. आमदार सावकारे यांनी या योजनेचे श्रेय लाटू नये, असा मार्मिक टोलाही त्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये लगावला आहे तर आमदार संजय सावकारे यांनी मात्र या योजनेशी जिल्हा परीषद सदस्याचा दुरान्वये संबंध नसल्याचे सांगून केंद्रासह राज्याची ही योजना असल्याचे सांगून जि.प.सदस्यांच्या दाव्यातील हवा काढली आहे. योजनेचे श्रेय घेण्यावरून पदाधिकार्‍यांमध्ये रंगलेला कलगीतुरा नागरीकांसाठी मनोरंजनाची बाब ठरत असून आगामी निवडणुकांची ही नांदी असल्याचेही मत राजकीय विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

उपोषणावेळीच आमदारांनी यंत्रणेला धरले होते धारेवर
कंडारी येथील सूर्यभान पाटील यांच्यासह यशवंत चौधरी यांनी काही महिन्यांपूर्वी गावाचा पाणीप्रश्‍न सुटण्यासाठी उपोषण छेडले होते तर या उपोषणाची दखल घेत आमदार संजय सावकारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) च्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. खडक्यासह अन्य गावांना जलस्वराज्य योजना लागू झाली असताना कंडारीकरांवरच अन्याय का? याबाबत अधिकार्‍यांना फैलावर घेत टँकरने किती वर्ष पाणीपुरवठा सुरू ठेवणार? असे सांगत तातडीने जलस्वराज्य योजनेत या गावाचा समावेश करण्याची मागणी त्यावेळी आमदारांनी केली होती, असे जाणकार सांगतात.

योजना मंजूर होताच रंगला कलगीतुरा
भुसावळ ग्रामीणसह तालुक्यातील साकेगाव व कंडारी येथील पाणीप्रश्‍न सुटण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना टप्पा क्रमांक तीनमधून या गावांसाठी तब्बल 31 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती बुधवारी आमदार संजय सावकारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली होती तर लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचेदेखील सांगितले होते. केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्यामुळे ही योजना मंजूर झाल्याचे आमदारांनी सांगितले होते. आमदारांच्या दाव्याला 24 तास पूर्ण होत नाही तोच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे ही योजना मंजूर झाल्याचा दावा केला असून ईतरांनी त्याबाबत घेतलेले श्रेय हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. योजनेच्या मंजुरीवरून दोघा प्रतिनिधींमध्ये रंगलेला कलगीतुरा तालुकावासीयांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे तर दुसरीकडे पाण्याची समस्या सुटल्याने नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आमदारांच्या नव्हे आपल्या पाठपुराव्यामुळे यश -रवींद्र पाटील
मे 2018 पासून जिल्हा परीषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जळगाव या विभागातील अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार सुरू ठेवला होता. आज साकेगाव व कंडारी गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आमदारांच्या प्रयत्नांनी नव्हे तर आपल्या पाठपुराव्याने योजना मंजूर झाल्याचा दावा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना केला.

जिल्हा परीषद सदस्याचा संबंध नाही -आमदार सावकारे
केंद्र व राज्य शासनाची ही योजना आहे. जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटलांनी योजना मंजुरीसाठी घेतलेले श्रेय हास्यास्पद आहे शिवाय त्यांचा या योजनेशी दुरान्वये संबंध नाही. जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोनमध्ये या गावांचा समावेश न झाल्याने आपण स्वतः पाठपुरावा केल्यानंतर राष्ट्रीय पेयजल योजना टप्पा क्रमांक तीमध्ये तीन ठिकाणच्या योजनांचा समावेश करण्यात आला असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. सर्वच योजनांचे श्रेय मग जिल्हा परीषद सदस्यांनी घ्यावे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.