पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय टंचाई सुटणे अशक्य

0

बोदवड (प्रतिनिधी) – तालुक्यातील पर्जन्यमान ईस्त्रायलपेक्षा जास्त आहे. तरी बोदवडला पाणी टंचाई निर्माण होते. जोपर्यंत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार नाही, असे प्रतिपादन डॉ. सुधीर भोंगळे यांनी केले. ते बोदवड महाविद्यालयात ग्रामीण समस्या व आव्हानांच्या निवारणासाठी नवतंत्रातील परिवर्तन या विषयावर उद्घाटक म्हणून बोलत होते.

पाण्याचा हिशोब नसल्याने नियोजन फसते
महाराष्ट्रातील लाखो हेक्टर जमीन कोरडवाहू आहे. पाणी अडवणे, पाणी जिरवणे व पाणी मुरवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. वरुण सुतात पाच हजार वर्षांपुर्वी सांगितले आहे. पाण्याचे नियोजन, पाण्याचे महत्व, विना पाण्याची शेती करणे आतापर्यंत कोणाला जमले नाही. पाण्याचा हिशोब आतापर्यंत केला नाही म्हणून पुढचे नियोजन फसते असेही डॉ. सुधीर भोंगळे यांनी सांगितले.

दोन सत्रात शेतकर्‍यांना मार्गदर्शन
कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाशचंद सुराणा होते. व्यासपीठावर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष मिठलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा, प्राचार्य ए.पी. राजपूत, केळीतज्ञ के.बी. पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रात करण्यात आले होते. दुसर्‍या सत्रात बोदवड परिसरात टिश्यु कल्चर डाळींब लागवड, माती, पाणी परिक्षण व जमिनीतील अन्य घटकांचे व्यवस्थापन डॉ. विक्रांत भालेराव, मिडो आर्चंड पेरु लागवड तंत्रज्ञान डॉ. सुनिल पाटील, हळद लागवड तंत्रज्ञान डॉ. जितेंद्र कदम, आंबा लागवड डॉ. अनिल ढाके, सिताफळ लागवड डॉ. बाळकृष्ण, ठिबक सिंचन कापूस लागवड डॉ. संजीव पाटील, विविध पिकांचे किड रोग व्यवस्थापन अक्षद कोटेचा, दूध उत्पादन वाढीसाठी हायड्रोपेनिक चारा उत्पादन विजयसिंग पाटील आदींनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन डॉ. गीता पाटील यांनी केले. आभार डॉ. एस.आर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कला, वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.