पाडळसरे येथे श्रीमद भागवत कथा व हरिनाम कीर्तन सप्ताह

0

अमळनेर । दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही श्री क्षेत्र पाडळसरे येथील ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सव व रामनवमी निमित्ताने येथे हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प.कै.डोंगजी महाराज व वेदमुर्ती कमलाकर शास्त्री यांनी सुरू केलेली चैत्रोत्सव व रामनवमी जन्मोत्सवाची परंपरा आजही पाडळसरे येथील संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांकडून अखंडपणे सुरु आहे. मंगळवारी 4 पासून चैत्र शुध्द रामनवमी पासुन श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होणार आहे. तर हनुमान जयंतीला काल्याच्या कीर्तनाने महाप्रसाद वाटप होऊन सांगता होणार आहे.

ग्रामदैवत अंबिका माता मूर्तीची व विठ्ठल- रुक्मिणी मुर्तीची विधीवत पुजन होउन श्रीमद भागवत ग्रथ व व्यासपीठाची मांडणी व पुजन होउन श्रीमद भागवत कथेस भागवताचार्य ह. भ. प. नंदकिशोर लासुरकर हे कथेचे निरूपनाने प्रारंभ करणार आहे. वेदमुर्ती दिलीप पाठक श्रीमद भागवत जप करणार आहे. त्यात दैनिक कार्यक्रमानुसार दररोज सकाळी 5.30 ते 6.30 यावेळेस काकडा आरती होणार आहे. 9 ते 11 भागवत पारायण होऊन सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 8 ते 10 या वेळास जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी कीर्तनासाठी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे महाराज किर्तनरूपी सेवा देणार आहे.