Private Advt

पाडला खुर्द शिवारात खून : सात आरोपींना अटक

अटकेतील सात आरोपींमध्ये पहिल्या पत्नीचाही समावेश : रावेर पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा

रावेर : तीन वर्षांपूर्वी पत्नीला पळवून नेल्यानंतर झालेल्या वादाच्या खुमखुमीनंतर आठ संशयीतांनी एकाचा खून करून मृतदेह जमिनीत गाडला मात्र नातेवाईकांमध्ये उफाळलेल्या वादाची कुणकुण रावेर पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तपासचक्रे गतिमान करीत खुनाचा उलगडा करीत सात आरोपींच्या शनिवारी मुसक्या आवळल्या. या घटनेत प्रताप खुमसिंग भील (46) यांचा खून झाला. विशेष बाब म्हणजे या खुनात तीन वर्षांपूर्वी पळून गेलेल्या पत्नीचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

पत्नीला पळवून नेल्याच्या कारणावरून केला खून
रावेर पोलिसांच्या माहितीनुसार, मयत प्रताप खुमसिंग भील (46) यांची पत्नी सागरीबाई यांना सुमारे तीन वर्षांपूर्वी लक्ष्मण वेरसिंग भील याने पळवून नेल्याने प्रताप व लक्ष्मण यांच्या टोकाचे वाद झाले होते. या वादाच्या खुमखुमीतून 21 ऑगस्टच्या सुमारे 15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पाडला खुर्द शिवारात नागोरी नदीचे बाजुला असलेल्या मीराबाई गोविंदा चौधरी यांचे शेतात प्रताप भील यांचा गळा आवळून तसेच टोकरांनी डोक्यावर मारहाण करून खून करण्यात आला व मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता व नंतर अन्य आरोपींनी मृतदेह विहिरीतून काढत जमिनीत दफन केला होता.

नातेवाईकांमध्ये वाद उफाळल्याने खुनाचा गुन्हा उघड
शनिवार, 21 ऑगस्टच्या पंधरा दिवसापूर्वी आरोपींनी खून करून मृतदेह जमिनीत पुरला होता मात्र पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचली नाही मात्र संशयीत आरोपींमध्ये वाद उफाळला व रावेर पोलिसांपर्यंत ही बाब पोहोचली. रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे यांनी या प्रकाराची गंभीर देत सुरूवातीला प्रताप भील हे हरवल्याची तक्रार दाखल करीत चौकशीला सुरूवात केल्यानंतर खुनाचा गुन्हा उघड झाला. तहसीलदारांच्या परवानगीनंतर दफन केलेले प्रेत उकरून काढण्यात आले. सात आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली तर एक संशयीत पसार झाला आहे. मृतदेह कुजल्याने घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.

या आरोपींना झाली अटक
प्रताप भील यांच्या खून प्रकरणी संशयीत आरोपी लक्ष्मण वेरसिंग भील, सागरीबाई लक्ष्मण भील (दोघे रा.रोहिणी, ता.नेपानगर), झिंगला शहादा भील (भसाली बोरी, ता.जि.बुर्‍हाणपूर), इस्माईल हसन तडवी, महेबूब कासम तडवी (दोन्ही रा.पाडला खुर्द, टाल्या शहादा भील, जितेंद्र सुरमल भील, सुरमल शत्तरसिंग भील (तिन्ही रा.बसाली पोस्ट, बोरी बुजूर्ग, ता.जि.बर्‍हाणपूर, म.प्र., ह.मु.पाडला खुर्द गाव शिवार सातपुडा पर्वताचे पायथ्याशी) यांच्याविरोधात गुरनं.288/2021, भादंवि 302,201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. झिंगला शहादा भील या आरोपी व्यतिरीक्त वरील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, प्रताप भील यांचा खून करताना त्यांची पत्नी सागरीबाई देखील आरोपींसोबत सहभागी झाली.

यांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा
रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोहर जाधव, उपनिरीक्षक मनोज वाघमारे, एएसआय राजेंद्र करोडपती, हवालदार बिजू फत्तु जावरे, नाईक जगदीश पाटील, नाईक महेंद्र सुरवाडे, नाईक नितीन डांबरे, कॉन्स्टेबल सुरेश मेढे, प्रमोद पाटील, प्रदीप सपकाळे, सचिन घुगे, मनोज मस्के, सुकेश तडवी, गोपाळ पाटील, संजय मेढे, उमेश नरवाडे, श्रीराम कांगणे, कल्पेश आमोदकर, विशाल पाटील आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. तपास उपनिरीक्षक मनोहर जाधव करीत आहेत.