Private Advt

पाटणादेवी अभयारण्यात डिंकाची चोरी : चौघे जाळ्यात

28 किलो डिंक जप्त : दोघे संशयीत पसार : गोपनीय माहितीवरून कारवाई

चाळीसगाव : पाटणादेवी अभयारण्यातील जुनोने भागातून डिंकाची तस्करी करणार्‍या टोळीच्या वनविभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून रावेरातील संशयीतासह मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरच्या टोळीतील अन्य तिघांना अटक केली असून दोन संशयीत पसार झाले आहेत. वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करीत 28 किलो डिंक, अ‍ॅपे रीक्षा जप्त केली आहे. संशयीतांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
औरंगाबाद वनविभाग अंतर्गत येणार्‍या गौताळा (पाटणादेवी) अभयारण्यात, चाळीसगाव वनपरीक्षेत्रातील जुनोने भागात, डिंक तस्कर आल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. वनरक्षक माधुरी जाधव, राहुल पवार यांच्यासह पथकाने चौघांना पकडले. या कारवाईत अ‍ॅपे रीक्षा चालक बहादूर निजाम तडवी (33, रा.विवरे बु., ता.रावेर), तुराब नवाब तडवी (22), अमजद सलीम तडवी (21), धुरसिंग इस्माईल बारेला ( 48, तिघे रा.वर्डी, ता.बर्‍हाणपूर) यांना अटक करण्यात आली तर अन्य दोन संशयीत पसार झाले. पथकाने आरोपींच्या ताब्यातून धावडा वृक्षातून काढलेला 14 हजारांचा 28 किलो डिंक व गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅपे रीक्षा (क्र.एम.एच.19 बी.जे.2806) जप्त केली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम व भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई वनपरीक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बोढरा वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक माधुरी जाधव, ए.जे.जाधव, बापू अगोणे, राहुल पवार, मजूर कैलास राठोड, पतींग राठोड, रामेश्वर राठोड, गौतम अळिंग, बाबासाहेब अळिंग, साईनाथ चव्हाण, तोताराम राठोड आदींच्या पथकाने केली.

चार लाखांच्या मुद्देमालासह दोघे जाळ्यात : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगिरी