पाटकरांची अवैध सावकारीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

0

शिरपूर । तालुक्यातील भाटपुरे येथील मधुकर रामदास पाटकर (दोरीक) व त्यांची पत्नी शांता मधुकर पाटकर यांची अवैध सावकारी केल्याच्या आरोपातून शिरपूर येथील सहा.निबंधक मनोज चौधरी यांनी निर्दोष मुक्तता केली. भाटपुरे येथील मधुकर पाटकर व त्यांच्या पत्नी शांता पाटकर गाव परीसरात मूळ मालकांना रीतसर मोबदला अदा करून नोंदणीकृत दस्तऐवजान्वये शेतजमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे शेत मिळकतीवर तेव्हापासून मालकी हक्काने मधुकर पाटकर यांचाच कब्जा असल्याचा निर्वाळाही या निकालात देण्यात आला.

2016 मध्ये घेण्यात आली होती घराची झडती
भाटपुरे येथील रोशन सुरेश सोनवणे व अन्य काहींनी मधुकर पाटकर हे अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार सावकारांचे निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली होती. त्यात खरेदी खतांचे व्यवहार नाकारून मिळकतींवर स्वत:चाच कब्जा असल्याचे नमूद केले होते. तक्रारीनंतर 2 फेबु्रवारी 2016 रोजी पाटकर यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. त्यात काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. त्यानंतर या तक्रारीवर कामकाज होवून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. चौकशीअंती तक्रारीमध्ये तथ्य न आढळल्याने सर्व तक्रारी फेटाळून लावण्यात आल्याचा निकाल देण्यात आला. मधुकर पाटकर यांनी शिरपूर येथील दिवाणी न्यायालय यांच्या कोर्टात मनाई हुकूमाचे दावेही दाखल केलेले आहेत. त्यातील बहुतांश दावे मधुकर पाटकर यांचा ताबा मालकी हक्काने असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहेत व मनाईहुकूमही दिलेला आहे. याकामी मधुकर पाटकर व शांता पाटकर यांच्यातर्फे अ‍ॅड.एस.आर.सोनवणे अ‍ॅड. निखील सोनवणे यांनी काम पाहिले त्यांना अ‍ॅड.प्रिती श्रीराम व अ‍ॅड.भाईदास पावरा यांचे सहकार्य लाभले.