Private Advt

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ करीत मारहाण : मालेगावातील पतीसह तिघांविरोधात गुन्हा

जळगाव : चारचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये न आणल्याने तसेच महागड्या वस्तू न आणल्याने जळगावातील विवाहितेचा छळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मालेगावस्थित पती, सासु व सासर्‍यांविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण करीत केला छळ
जळगाव शहरातील शिवाजी नगरातील माहेर व मालेगाव येथील सासर असलेल्या दीपाली कुणाल अहिरे (28) यांचा विवाह मालेगाव येथील कुणाल शिवाजी अहिरे यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. दरम्यान, पती कुणाल याने विवाहितेला कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे, अशी मागणी केली. पैश्यांची पूर्तता न केल्याने विवाहितेला शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली तसेच विवाहितेच्या अंगावरील 39 ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतले तसेच सासू व सासरे यांनीदेखील पैश्यांसाठी तगादा लावला. विवाहितेला हा प्रकार सहन न झाल्याने जळगावातील शिवाजी नगरातील माहेरी निघून आल्या.

पतीसह तिघांविरोधात गुन्हा
सोमवार, 21 मार्च रोजी विवाहितेने जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती कुणाल शिवाजी अहिरे, सासू करूणा शिवाजी अहिरे, सासरे शिवाजी चिला अहिरे (सर्व रा.मालेगाव, जि.नाशिक) यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहे.