पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा आईनेच केला खून

सातारा : उशीने नाक-तोंड दाबून जन्मदात्या मातेनेच आपल्या पाच महिन्यांच्या बाळाचा खून केला. ही धक्कादायक घटना तरडगाव, ता.फलटण येथे घडली. या प्रकरणी आरोपी महिलेस अटक करण्यात आली. खुनाचे नेमके कारण कळू शकले नाही.

खून करून पोलिसांना दिली माहिती
बाळाची आई व संशयीत आरोपी आरती गायकवाड लोणंद पोलिस ठाण्यात फोन करून ‘आपण स्वत: आपल्या पाच महिन्यांच्या लहान बाळाला 12 एप्रिल रोजी ठार मारून पुरलेले आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा, अन्यथा मी आणखी दुसर्‍या कोणाचा तरी खून करेन’ असे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केली असता तिने तिचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक-तोंड दाबून ठार मारले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस हवालदार विठ्ठल काळे यांनी लोणंद पोलिसांत फिर्याद दिली. महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरती गायकवाडला पोलिसांनी अटक करून फलटण न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, तिने आपल्या पोटच्या गोळ्याला का संपवले याचे कारण समजू शकले नाही.