पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा आ. महाजनांकडून आढावा

0

पाचोरा-(प्रतिनिधी)- शहरात दिवसेंदिवस कोरोना कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव बघता माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज पाचोरा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत शहरात ९ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यावर प्रशासनाने उपाययोजना म्हणून केलेली तयारी, आयसोलेशन वॉर्ड, अधिग्रहित केलेले रुग्णालय, पी.पी.ई.किटची उपलब्धता सोबतच प्रतिबंधीत केलेले परिसर याबाबत सविस्तर आढावा घेतला. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसह महसूल व पोलिस विभागातील कर्मचार्‍यांना येणार्‍या अडचणीबाबत यावेळी चर्चा केली. या सर्व अडचणींसह केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतल्यानंतर आ. महाजन यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतुक करून योग्य ती काळजी घेऊन अधिकच्या उपाययोजनांवर भर द्यावी असे सांगितले.
पाचोरा प्रांताधिकारी यांनी माजी मंत्री महाजन यांच्या जी.एम. फाउंडेशनच्यावतीने पी.पी.ई. किट व सॅनिटाजर मिळाल्याने प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानले. त्यामुळे स्थानिक स्तरावर रुग्णांचे स्वॅब घेणे सुरक्षितरित्या शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कुठल्याही प्रकारच्या मदतीस यावेळी आ.महाजन यांनी प्रशासनाला आश्वासित केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर काकडे, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे आदी उपस्थित होते.

Copy