Private Advt

पाचोर्‍यात पित्याची हत्या ; आरोपी दोघा मुलांना अटक

आईच्या चारीत्र्यावर संशय घेतल्याने मुलांनी पित्यालाच संपवले : पत्नीच्या तक्रारीवरून मुलांविरोधात खुनाचा गुन्हा

पाचोरा : आईच्या चारीत्र्यावर वडिल वारंवार संशय घेत असल्याने सतत कुटुंबात होत असलेल्या वादानंतर संतापलेल्या मुलांनी वडिलांची धारदार चाकूचे अनेक वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना पाचोरा शहरातील भास्कर नगरात रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेत संजय बंकट खेडकर (46) यांचा मृत्यू झाला तर खून प्रकरणी संशयीत आरोपी मनोज खेडकर (22) व प्रतीक खेडकर (24) या भावंडांना अटक करण्यात आली. या प्रकरणी मयताच्या पत्नी वंदना खेडकर यांच्या फिर्यादीनुसार मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चारीत्र्याच्या संशयावरून पित्याची केली हत्या
पाचोरा शहरातील भास्कर नगरात खेडकर कुटुंब वास्तव्यास आहे. संजय खेडकर हे इलेक्ट्रीकल व्यावसायीक आहेत. खेडकर हे पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत असल्याने कुटुंबात नेहमीच वाद होत होते शिवाय शनिवारी रात्रीदेखील दाम्पत्यात जोरदार भांडण झाले व मध्यरात्री पर्यंत हा प्रकार सुरूच होता. दाम्पत्यातील भांडणानंतर मध्यरात्री दोन्ही वरच्या रूममध्ये आल्यानंतर वडिलांनी धारदार चाकू काढला त्याचवेळी मुलाने तो चाकू पकडल्याने त्याच्या हाताला जखम झाली तर दुसर्‍या मुलाने वडिलांना पाठीमागून पकडताच एका मुलाने पोटावर चाकूचे सपासप वार केले तर दुसर्‍या पुन्हा पाठीमागून चाकूचे वार सुरूच ठेवल्याने खेडकर यांचा मृत्यू झाला.

दुपारपर्यंत सांगितली नाही घटना
वडिलांचा घरात खून झाला असताही मुलांनी वा पत्नीने ही घटना तातडीने पोलिसांना कळवलीच नाही. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वंदना खेडकर या पाचोरा पोलिस ठाण्यात आल्या व त्यांनी पती हा माझ्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेत असल्याचे सांगून जोरदार भांडणातून मुलांनी त्यांना चाकू मारल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगताच पोलिसही हादरले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. यावेळी दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेत नंतर त्यांना अटक केली.

मुलांविरोधात खुनाचा गुन्हा : आईच फिर्यादी
रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असलीतरी प्रत्यक्षात ती दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक भारत कातकाडे, पोलिस निरीक्षक नजन किसन पाटील व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. आरोपी मनोज व प्रतीक खेडकर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात मयताची पत्नी व संशयीतांची आई वंदना खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील करीत आहेत.