Private Advt

पाचोर्‍यात पित्याचा खून : आरोपी भावंडांना पोलिस कोठडीची हवा

पत्नीच्या तक्रारीवरून मुलांविरोधात खुनाचा गुन्हा ः पोलिसांनी चॉपर केला जप्त

पाचोरा : आईच्या चारीत्र्यावर वडिल वारंवार संशय घेत असल्याने सतत कुटुंबात होत असलेल्या वादानंतर संतापलेल्या मुलांनी वडिलांची धारदार चॉपरचे अनेक वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना पाचोरा शहरातील भास्कर नगरात रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेत संजय बंकट खेडकर (46) यांचा मृत्यू झाला तर खून प्रकरणी संशयीत आरोपी मनोज खेडकर (22) व प्रतीक खेडकर (24) या भावंडांना अटक करण्यात आली. या प्रकरणी मयताच्या पत्नी वंदना खेडकर यांच्या फिर्यादीनुसार मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी भावंडांना पाचोरा न्यायालयात सोमवारी दुपारी हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर गुन्ह्यातील चॉपर जप्त करण्यात आले.

चारीत्र्याच्या संशयावरून पित्याची केली हत्या
पाचोरा शहरातील भास्कर नगरात खेडकर कुटुंब वास्तव्यास आहे. संजय खेडकर हे इलेक्ट्रीकल व्यावसायीक आहेत. खेडकर हे पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत असल्याने कुटुंबात नेहमीच वाद होत होते त्यामुळे पत्नी व दोन मुले भाड्याच्या घरात काही दिवस राहिले व नंतर पुन्हा ते वडिलांमध्ये येवून राहिल्यानंतर शनिवारी रात्रीदेखील दाम्पत्यात जोरदार भांडण झाले व मध्यरात्री पर्यंत हा प्रकार सुरूच होता. दाम्पत्यातील भांडणानंतर मध्यरात्री दोन्ही मुले वरच्या रूममध्ये आल्यानंतर वडिलांनी धारदार चॉपर बाहेर काढला त्याचवेळी मुलाने तो चॉपर पकडल्याने त्याच्या हाताला जखम झाली तर दुसर्‍या मुलाने वडिलांना पाठीमागून पकडताच एका मुलाने पोटावर चॉपरने सपासप वार केले तर दुसर्‍या मुलाने पुन्हा पाठीमागून चॉपरचे वार सुरूच ठेवल्याने खेडकर यांचा मृत्यू जागीच झाला.

दुपारपर्यंत सांगितली नाही घटना
वडिलांचा घरात खून झाला असताही मुलांनी वा पत्नीने ही घटना तातडीने पोलिसांना कळवलीच नाही. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वंदना खेडकर या पाचोरा पोलिस ठाण्यात आल्या व त्यांनी पती हा माझ्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेत असल्याचे सांगून जोरदार भांडणातून मुलांनी त्यांना चॉपर मारला व त्यात त्यांचा झाला असल्याचे सांगताच पोलिसही हादरले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. यावेळी दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेत नंतर त्यांना अटक केली.

मुलांविरोधात खुनाचा गुन्हा : आईने दिले फिर्याद
रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असलीतरी प्रत्यक्षात ती दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक भारत कातकाडे, पोलिस निरीक्षक नजन किसन पाटील व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. आरोपी मनोज व प्रतीक खेडकर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात मयताची पत्नी व संशयीतांची आई वंदना खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना सोमवारी पाचोरा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर गुन्ह्यातील चॉपर पोलिसांनी जप्त केला आहे. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश चौबे करीत आहेत.