पाचोर्‍यातील व्यापार्‍याला हरभरा खरेदीनंतर 83 लाखांचा गंडा

पाचोरा : शहरातील येथील मोंढाळे रोडवरील कोल्ड स्टोरेजमधून हरभरा धान्य खरेदी करून पहुरच्या व्यापार्‍यास मालाचे पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ करत असल्याने नंदुरबार येथील व्यापार्‍याविरुध्द पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

माल विक्रीनंतरही पैसे देण्यास टाळाटाळ
पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील कृष्णा कोल्ड स्टोरेज व किरण कोल्ड स्टोरेज मध्ये बालाजी प्रो.प्रा.चे मालक अनिल उत्तम जैन रा. पहुर पेठ, ता. जामनेर यांनी हरभरा धान्य हे भाडेतत्त्वावर ठेवले होते. दरम्यान नंदुरबार येथील निखील ट्रेडर्सचे मालक निखील हेमराज गेलडा यांनी अनिल जैन यांचेकडून 10 जून आणि 14 जून रोजी एकूण 77 लाख 20 हजार 252 रुपये किंमतीचा हरभरा तसेच अनिल जैन यांचा मुलगा दिनेश अनिल जैन यांनी देखील निखिल ट्रेडर्सचे मालक निखील गेलडा यांना पाच लाख 76 हजार 533 रुपयांचा माल विकला होता. मालाचे पैसे माल खरेदी केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी देण्याचे ठरले होते. मात्र एक महिना उलटूनही मालाचे पैसे मिळाले नसल्याने व निखील गेलडा हे वारंवार खोटी आश्वासने देवून वेळ मारुन नेत असल्याने अनिल उत्तम जैन यांच्या फिर्यादीवरून मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये निखील ट्रेडर्सचे मालक निखील हेमराज गेलडा (रा.श्रीराम कॉलनी, नंदुरबार) यांच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.