पाचोर्‍यातील विवाहितेची आत्महत्या : घातपात झाल्याचा भावाचा आरोप

पाचोरा : शहरातील गणपती नगरातील रहिवासी प्रिया शहा देव (26, मूळ रा.भोपाळ, मध्यप्रदेश) या विवाहितेचा सोमवार, 8 ऑगस्ट रोजी गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विवाहितेचा घातपाती मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.

विवाहपासून उडत होते खटके
प्रिया देव या तरुणीचा विवाह एम. एस. एफ. मध्ये सेवेत असलेले व पाचोरा रहिवासी विनोद सुरवाडे (रा. गणपती नगर, पुनगाव रोड, पाचोरा) यांच्याशी पाचोरा येथे 30 ऑगस्ट 2021 रोजी मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान विवाह झाल्यापासून पती-पत्नी मध्ये किरकोळ कारणावरून नियमित भांडण होत असत. याबाबत प्रिया हिने वारंवार आपल्या माहेरच्या मंडळींना याबाबत कल्पना दिली होती. रविवार, 7 ऑगस्ट रोजी सुद्धा प्रिया व विनोद यांच्यात सकाळ पासुनच भांडण सुरू झाले होते. याच दिवशी प्रिया हिने रात्री 9 ते 12 वाजेला टप्प्या- टप्प्याने भोपाल येथे वास्तव्यास असलेल्या आपली बहिण दिपाली शेजवाल भ्रमणध्वनीद्वारे पती विनोद हा दिवसभर भांडण करत असल्याची कल्पना दिली. दरम्यान वाद विकोपाला जाऊ नये म्हणून प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व त्याचे मेहुणे शशांक शेजवाल हे प्रिया व विनोद यांना समजविण्यासाठी तसेच येणार्‍या रक्षाबंधन सणासाठी बहिण हिस भोपाल येथे घेवुन जाण्याच्या उद्देशाने भोपाल येथू रविवार, 7 ऑगस्ट रोजी रात्री पाचोरा येथे येण्यासाठी निघाले. दरम्यान याबाबत शशांक शेजवाल यांनी विनोद सुरवाडे यांना पूर्वसूचनादेखील दिली होती.

बहिणीचा घात-पाती मृत्यू झाल्याचा आरोप
सोमवार, 8 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास विनोद सुरवाडे यांच्या मामी या प्रिया हिस चहा देण्यासाठी खोलीत गेल्यानंतर प्रिया हिने गळफास घेतल्याचे दिसून आले तर प्रियाच्या भावाला ही घटना कळताच त्याने आक्रोश केला.
माझी बहिण आत्महत्या करुच शकत नाही, असा संशय प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व मेहुणे शशांक शेजवाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच घटनास्थळाची वस्तुस्थिती देखील संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.