Private Advt

पाचोरा शहर खुनाने हादरले : आईच्या चारीत्र्यावर संशय घेणार्‍या पित्याचा मुलांनीच केला खून

पाचोरा (गणेश वाघ) : आईच्या चारीत्र्यावर वडिलांनी घेतलेल्या संशयामुळे घरात झालेल्या टोकाच्या भांडणातून दोघा मुलांनी पित्यावर धारदार चाकूचे सपासप पाच वार केल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक पाचोरा शहरातील भास्कर नगरात रविवारी मध्यरात्री घडली. संजय बंकट खेडकर (46) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून खून प्रकरणी संशयीत आरोपी रोहित खेडकर (22) व प्रतीक खेडकर (24) या भावंडांना अटक करण्यात आली.

चारीत्र्याच्या संशयावरून पित्याची केली हत्या
पाचोरा शहरातील भास्कर नगरात खेडकर कुटुंब वास्तव्यास आहे. संजय खेडकर हे इलेक्ट्रीकल व्यावसायीक असून त्यांचे पाचोरा शहरात इलेक्ट्रीक दुकान आहे. खेडकर हे पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत असल्याने कुटुंबात शनिवारी रात्री जोरदार भांडण झाले व मध्यरात्री पर्यंत हा प्रकार सुरूच होता. आईच्या चारीत्र्यावरील संशयामुळे चिडलेल्या संशयीत रोहित व प्रतीक यांनी घरातील धारदार चाकूने वडिलांच्या पोटावर, पाठीवर व डोक्यावर सपासप वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक भारत कातकाडे, पोलिस निरीक्षक नजन किसन पाटील व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र
जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत दोन तर रामानंंद नगर पोलिस स्टेशनला एक व एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत एक अशा तीन आठवड्यांच्या कालावधीत खुनाच्या घटना घडलेल्या असताना रविवारी पहाटे पाचोरा शहरात पुन्हा खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.