पाचोरा व भडगाव शहरातील अतिक्रमित घरे होणार नियमित : प्रांतांनी पालिकांना दिले मोजणी फी भरण्याचे आदेश

भुसावळ/पाचोरा : शासन निर्णयाप्रमाणे 2011 पूर्वीचे पाचोरा व भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती आली असून पाचोरा शहरातील सुमारे साडे तीन हजार तर भडगाव शहरातील सुमारे तीन हजार अतिक्रमित धारकांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत शुक्रवारी दुपारी 12 वाजता प्रांताधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत मोजणी प्रक्रिया पूर्ण करणेकामी दोन्ही पालिकांनी तातडीने मोजणी रक्कम भरावी तसेच भूमि अभिलेख कार्यालयाने देखील तातडीने मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. आमदारांच्या वतीने स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल, पाचोरा तालूका भूमी अभिलेख अधिकारी आर.एस.घेटे, भडगाव तालुका भूमी अभिलेख अधिकारी सय्यद यांच्यासह पाचोरा मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, नगररचना विभागाच्या मानसी भदाणे, बांधकाम विभागाचे प्रकाश पवार, पाचोरा नायब तहसीलदार संभाजी पाटील, भडगाव येथून नायब तहसीलदार देवकर, बांधकाम विभागाचे नितीन पाटील आदींची उपस्थिती होती.

लवकरच होणार मोजणीची प्रक्रिया
बैठकीत पाचोरा शहरातील घरांसाठी आकारलेली सुमारे 90 लक्ष मोजणी फी शासनाकडून कमी करून आता 45 लक्ष रुपये पाचोरा पालिकेने तातडीने भरण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ.बांदल यांनी दिले आहेत. आगामी महिन्याभरात मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्धिष्ट देण्यात आले असून भडगाव पालिकेला देखील प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे. दरम्यान पालिकेने मोजणी फी भरल्यानंतर तातडीने ईटीएस मशिनद्वारे मोजणी प्रक्रिया राबवली जाईल तसेच गरज भासल्यास अतिरीक्त मनुष्यबळ वापरून लवकरात लवकर आम्ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया पाचोरा भूमीलेख अधिकारी एस.आर.घेटे यांनी दिली. दरम्यान, अतिक्रमण धारकांचे आपल्या हक्काचे घर आता नावावर होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.

Copy