Private Advt

पाचोरा-भडगावातील मातोश्री शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने सुरूवात करा

आमदार किशोरअप्पा पाटील यांचे आढावा बैठकीत अधिकार्‍यांना आदेश

पाचोरा : पाचोरा-भडगावातील मातोश्री शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने सुरूवात करा, असे आदेश पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरअप्पा पाटील यांनी दिले. महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक सोमवारी शिवालय या आमदारांच्या संपर्क कार्यालयात झाली.

पावसाळ्यापूर्वी मिळावा दिलासा
आगामी पावसाळ्यापूर्वी शेतकर्‍यांचा त्रास काहिसा कमी होण्याच्या दृष्टीने मातोश्री शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने सुरूवात करावी, असे निर्देश आमदारांनी प्रसंगी दिले. पाचोरा व भडगाव तालुक्यात मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते अंतर्गत सुमारे 91 रस्ते मंजूर आहेत. पाचोरा तालुक्यात 57 तर भडगाव तालुक्यातील सुमारे 34 रस्त्यांचा समावेश आहे. लवकरच आणखी काही रस्त्यांना मंजुरी मिळणार असल्याने ही कामे तातडीने पूर्ण करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी बैठकीत ठरवण्यात आले.

प्रत्येकी एक किलोमीटर अंतराचा रस्ता होणार
या योजने अंतर्गत प्रत्यकी 1 किलोमीटर रस्ता केला जाणार असून यासाठी सुमारे 24 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. बैठकीला पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, पाचोरा गटविकास अधिकारी अतुल पाटील, भडगाव गटविकास अधिकारी वाघ, बांधकाम विभागाचे मुख्य सहाय्यक अभियंता डी.एम.पाटील, शेलार, काजवे तसेच पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंते, विस्तार अधिकारी यांची उपस्थित होते.