पाचोरा तालुक्यात पुन्हा दुचाकी अपघात : दोन महाविद्यालयीन युवक जागीच ठार

पाचोरा/भुसावळ : पाचोरा-भडगाव रस्त्यावर दोन युवकांचा दुचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेला 24 तास होत नाही तोच पुन्हा पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रस्त्यावर भोजे गावाजवळ दोन दुचाकींचा समोरा-समोर अपघात होऊन दोन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात नरेंद्र भगवान गव्हाळे (20, रा.चिंचपुरे, ता.पाचोरा) व जीवन संतोष कदम (17, रा.भोजे, ता.पाचोरा) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात बबन तडवी (25) व जब्बार तडवी (45) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची मालिका कायम
सूत्रांच्या माहितीनुसार दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.ए.0361) व (एम.एच.19-1436) यांच्यात धडक झाली. अपघाताचे वृत्त कळताच 102 रुग्णवाहिका चालक बाजीराव गीते यांनी चौघांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे यांनी दोघांना मृत घोषित केले. अपघाताचे वृत्त कळताच जिल्हा परीषद सदस्य मधुकर काटे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे परेश पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली .तर अपघातस्थळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे रणजीत पाटील, अरुण राजपूत, संदीप राजपूत, सचिन वाघ या कर्मचार्‍यांनी धाव घेत रुग्णवाहिका बोलावत जखमींना पाचोरा रुग्णालयात हलवत वाहतूक सुरळीत केली.