पाचवी ते आठवीचे विद्यार्थी होऊ शकतात नापास

0

पुणे । कमी गुण मिळाल्यास आता पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी नापास होतील. फेरपरीक्षेत देखील अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या बाबतीत राज्य सरकार निर्णय घेईल, तसे अधिकार त्यांना देण्यात येतील. याबाबतच्या कायद्याचा मसुदा तयार केला असून संसदेत तो मंजूर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

बालेवाडी येथील कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर जावडेकर पत्रकारांशी बोलत होते. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना नववीपर्यंत अनुत्तीर्ण करता येत नाही. अनेक विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या वर्गात ढकलले जाते. त्यामुळे त्यांची शैक्षणिक वाढ होत नाही. त्यांच्या पुढच्या आयुष्यात यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. यातून मार्ग काढण्यासाठी काही महिन्यांपूर्वी देशातील 25 राज्यातील शिक्षणमंत्री आणि सचिवांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री आणि अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पाचवी आणि आठवीत शैक्षणिक ज्ञान नसणार्‍या विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांमध्ये अनुत्तीर्ण करण्याबाबत मागणी केली. त्यानुसार विद्यार्थी नापास असल्यास नापासच करायचे, असे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आता शालेय प्रशासनाला विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण करता यईल. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची काही दिवसात फेरपरीक्षा घेण्यात येईल. फेरपरीक्षेत देखील विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा, याची जबाबदारी संबंधित राज्यांना देण्यात येणार आहे.