पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू

0

श्रीनगर । जम्मू-काश्मिरमधील पाकिस्तानच्या कुरापती थांबयाचे नाव घेत नाहीत. नौसेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. बुधवारी रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती समजते आहे. पाकने बुधवारी रात्री 11च्या दरम्यान गोळीबार केला. ज्याला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं. गुरुवारी सकाळीही पाककडून थोड्या फार प्रमाणात गोळीबार सुरू होता. पाकिस्तानच्या या आगळीकीचे भारतीय लष्करही चोख उत्तर देत आहे. पाकिस्तानकडून दोन बॉम्बहल्ले करण्यात आले. यातील एका बॉम्ब नौसेरा सेक्टरमध्ये राहणार्‍या मोहम्मद हनीफ यांच्या घराजवळ पडला. ज्यामध्ये हनीफ आणि त्याची पत्नी जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिथे त्याच्या पत्नीला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, बुधवारी रात्री 11 वाजता सुरू करण्यात आलेला गोळीबार नंतर थोडा कमी झाला होता. मात्र, अधूनमधून गोळीबार सुरूच होता. त्यामुळे या परिसरातील शाळा गुरवारी बंदच ठेवण्यात आल्या होत्या. या अगोदरही भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत सीमारेषेवरील पाकच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी भारताने अँटी टँक गायडेड मिसाईल्सचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे.